चित्रपटाद्वारे समाजातील सामाजिक विषयांचे चित्र प्रेक्षकांन समोर मांडणारे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक ‘प्रवीण तरडे’ पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी एक वेगळा विषय घेऊन आले आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळविणारे ‘हंबीरराव मोहिते’ यांची ख्याती अख्ख्या महाराष्ट्रात पसरली आहे. त्यांचा हाच जीवनप्रवास प्रविण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. प्रवीण यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.
सरसेनापती हंबिराव यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धमत्तेच्या जोरावर स्वराज्याला श्रीमंती मिळवून देण्यास मोठी मदत केली आहे. आणि आता त्यांचा हाच जीवनप्रवास चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांचेच असून, जानेवारी 2020 मध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.