पोस्टाच्या भरतीचे वाजले तीन तेरा; प्रक्रिया रखडली

विनोद पोळ
3650 जागांसाठीच्या मोठ्या भरतीची प्रक्रिया रखडली

कवठे – शासनाने पोस्टाच्या 3650 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली असून त्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र अनेक अडचणींमुळे ऑनलाइन अर्ज भरताना अडचणी निर्माण होत आहेत. शिवाय सर्व्हरच्या अडचणीमुळे अर्ज भरणे शक्‍य होत नसल्याने नोकरी इच्छुक तरुण धास्तावले असून या भरतीचे तीनतेरा वाजले आहेत.

केंद्र शासनाच्या सेवेचा भाग असलेली पोस्टाची 3650 जागांसाठीच्या भरतीची प्रक्रियेसंदर्भातील जाहिरात गेल्या महिन्यात प्रसिद्ध झाली होती. संपूर्ण देशभर वेगवेगळ्या 23 सर्कलमधून भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज भरती प्रक्रियेसंदर्भात सदर जाहिरातीत उल्लेख करण्यात आला. यामध्ये शाखा पोस्ट मास्तर, सहाय्यक शाखा पोस्ट मास्तर व डाकसेवक या तीन पदांच्यासाठी सदर प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

यासाठी शिक्षणाची अट ही इयत्ता दहावी पास व संगणकाचे मूलभूत ज्ञान व स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्‍यक एवढीच ठेवली आहे. व सदर जागांसाठी वेतनश्रेणी रक्कम सुद्धा चांगल्या प्रकारची असल्याने देशातील सर्वच नोकरी इच्छुक उमेदवारांची सदर फॉर्म भरविण्यासाठी झुंबड उडाली आहे. महाराष्ट्र व गोवा या सर्कलमध्ये 1 नोव्हेंबर पासून सदर भरतीप्रक्रिया सुरु झाली असून 30 नोव्हेबर ही फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे.

मात्र 1 तारखेपासून ते आजपर्यंत 26 दिवसांचा कालावधी उलटला तरीसुद्धा आजपावेतो या भरतीसाठीच्या ऑनलाइन साइटला ग्रहण लागले असून सदर वेबसाइट अद्याप सुरळीतपणे सुरुच होत नसल्याने उमेदवारांचे अर्ज भरण्यात असंख्य अडचणी निर्माण होत आहेत व बहुतांश उमेदवारांचे अर्ज या प्रक्रियेतून भरले जात नाहीत.

आता उमेदवारांच्या हातात फक्त चारच दिवस उरले असून दिनांक 30 नोव्हेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत असल्याने वारंवार ऑनलाइन पाहणी करूनसुद्धा या वेबसाइटवर काहीच प्रगती दिसून येत नसून ही वेबसाइट पूर्णत: बंद स्थितीत दाखवीत असल्याने व नोंदणीच्या पहिल्याच पायरीतून वेबसाइट बाहेर पडत असल्याने उमेदवारांच्या पदरी मात्र घोर निराशा येत आहे.

नोकऱ्यांची कमी उपलब्धता असताना केंद्र शासनाच्या संबंधित विभागात नोकरीसाठी इच्छुकांची संख्या खूप आहे. मात्र सर्व्हर व्यवस्थितरित्या प्रतिसाद देत नसल्याने तांत्रिकदृष्ट्य्‌ा दोषातून सदर फॉर्म भरले जात नाहीत. यात उमेदवारांचा दोष नसल्याने सदर दोष तात्काळ दूर केले जावेत. सदर ऑनलाइन भरती प्रक्रियेची मुदत वाढवून देण्यात यावी व होणारी गैरसोय टाळावी अन्यथा एक खूप मोठ्या संधीला सुशिक्षित बेरोजगारांना मुकावे लागेल अशी मागणी सर्वत्र होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.