यवत, – सर्वसामान्य जनता माझ्या पाठीशी आहे. पद असो वा नसो, मी सर्वसामान्यांसाठी तत्पर आहे, असे प्रतिपादन माजी आमदार रमेश थोरात यांनी केले. दौंड तालुक्यातील चौफुला येथील दत्त कार्यालयामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांनी मतदार यांचा जाहीर आभार कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी दौंड विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे वतीने रमेश थोरात यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव पत्कारावा लागला होता. पराभव होऊन देखील कार्यक्रमास मोठ्या संख्येने तालुक्यातील मतदार उपस्थित होते. आभार मेळाव्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. रमेश थोरात यांनी वक्तव्याने टाळ्यांच्या प्रचंड कडकडाट झाला.
थोरात म्हणाले, दौंडची सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ते हे गेल्या ५० वर्षांपासून माझ्या पाठीशी ठाम आणि भक्कमपणे उभी आहे, विधानसभा निवडणुकीत १ लाख ६ हजार ८३२ मते मिळाली आहेत. प्रामाणिकपणे आणखी भक्कमपणे साथ जनतेने मला दिली आहे. याही विधानसभा निवडणुकीत दौंडच्या जनतेने मला भक्कम साथ दिली आहे. माझा पराभव झाला असला तरी यामध्ये मला साथ देणाऱ्या जनतेचा दोष नाही. आजही आभार मेळाव्यात प्रचंड झालेली गर्दी यांचे प्रतिक आहे. मी आपल्या कायम ऋणात राहिल, मला यांचा आंनंद आणि अभिमान वाटत आहे.
शिवसेनेचे राजन खटटी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब कापरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी पराभवाबाबत विश्लेषण करणारी भाषणे केली.
विजयी आमदारांवर अप्रत्यक्ष टीकास्त्र
बादशहा शेख यांनी म्हणाले, समोरचे आमदार हे विरोधी कार्यकर्ते आणि जनतेला त्रास देण्यात धन्यता मानतात. आत्ता ते मंत्री होणार आहेत. ते मंत्री झाले की आमचे काय होईल, हे सांगता येत नाही. अशी भीती जाहीरपणे व्यक्त केली आहे. यावेळी महायुतीचे आमदार राहुल कुल यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावत जोरदार बॅटिंग केली.
सत्ताधाऱ्यांकडून त्रास झाल्यास प्रत्युतर देऊ
युवा नेते तुषार थोरात म्हणाले, आमचा पराभव झाला असला तरी तो आम्ही मान्य करीत आहे. परंतु तालुक्यात सत्ताधाऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास खपवून घेणार नाही. जशास तसे सडेतोड उत्तर दिले जाईल. मलाही अनेक गोष्टी करता येतात. आम्ही संयम सोडलेला नाही. मी वकील नाही तरीही मला त्यांना माहिती नसेल इतकी कायद्याची मला देखील माहिती आहे. सत्ताधाऱ्याकडून आमचे कार्यकर्ते यांना कोणताही नाहक त्रास झाला तर त्यांचे पुढे दोन पावले मी स्वतः असेल, अशी ग्वाही थोरात यांनी देताच टाळ्यांचा प्रचंड पाऊस झाला.