दहावी व बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये होणाऱ्या लेखी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीच्या परीक्षा 18 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा 3 मार्चपासून सुरू होणार आहेत.

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात एकाच वेळी दहावी व बारावीच्या लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. बारावीची परीक्षा 18 मार्चपर्यंत व दहावीची परीक्षा 23 मार्चपर्यंत सुरू राहणार आहेत. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे व्यवस्थित नियोजन करता यावे व विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा, महाविद्यालयांकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्‌सऍप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल होणारे वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

सूचना, हरकती 15 दिवसांत पाठवा
प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे. वेळापत्रकांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे व राज्य मंडळाकडे 15 दिवसांत लेखी स्वरुपात पाठवाव्यात. मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांचा विचार केला जाणार नाही, असेही जाहीर करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.