निर्देशांक वाढत जाण्याची शक्‍यता – झुनझुनवाला

नवी दिल्ली – देशातील आणि परदेशातील एकूण भांडवल सुलभतेची परिस्थिती आणि भारत सरकारने जाहीर केलेला धाडसी अर्थसंकल्प यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक आगामी काळातही वाढण्याची शक्‍यता ज्येष्ठ गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनी व्यक्त केली आहे.

त्यांनी असा दावा केला आहे की, निर्देशांकांना फक्त चढत्या क्रमाने वाढण्याची दिशा उपलब्ध आहे. त्यामुळे बाजारने उपलब्ध केलेल्या संधीचा फायदा गुंतवणूकदारांनी करून घेण्याची गरज आहे. ज्या गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यापासून गुंतवणुक केली आहे त्यांचा फायदा झाला आहे.

यापूर्वी झुनझुनवाला यांनी अनेकदा भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढतच जाणार असल्याचा दावा केलेला आहे. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर निर्माण झालेल्या तेजीबाबत बोलताना ते म्हणाले की, आपल्याला जेवढा समजत आहे त्यापेक्षा अर्थसंकल्पामध्ये मोठा संदेश आहे.

भारत सरकार वेगवान विकास दर साध्य करण्यासाठी आवश्‍यक त्या धाडसी उपाययोजना करण्यास तयार असल्याचा संदेश अर्थसंकल्पातून दिला गेला आहे. त्यासाठी राजकीय पातळीवरही धाडसी निर्णय घेण्याचे संकेत सरकारने अर्थसंकल्पातून दिले आहेत.

त्याचबरोबर स्थूल अर्थव्यवस्थेची मजबूत परिस्थिती पाहता पतमानांकन संस्थांनी भारताच्या परिस्थितीचे सकारात्मक मूल्यांकन करण्याची गरज असल्याचे सरकारने सांगितले आहे. विकासदर वाढता ठेवण्याबरोबरच सर्वसमावेशक विकास होण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे पंतप्रधानांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दाखवून दिले आहे, असे झुनझुनवाला यांचे म्हणणे आहे.

भारताचा विकास दर 11 टक्‍क्‍यापेक्षा जास्त होणार असल्यामुळे परदेशातून मोठ्या प्रमाणात भांडवल येणार आहे. या भांडवलाचा उपयोग करण्याची क्षमता भारताकडे असेल की नाही याबाबत त्यीा शंका व्यक्त केली. आगामी काळात कर संकलन वेगाने वाढवून तूटही कमी होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

परदेशातील पेन्शन आणि इतर फंडातून भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक वाढणार असल्याचे ते म्हणाले. सध्या भारतीय शेअर बाजारात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांची गुंतवणूक 28 टक्‍क्‍यापेक्षा जास्त झाली आहे. तिसऱ्या तिमाहीतच भारताचा विकास दर किमान एक टक्के होईल असे त्यांना वाटते. तर पुढील वर्षात तो दहा टक्‍क्‍यापेक्षा जास्त होणार असल्याचे सरकारनेच सांगितले आहे, असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.