राज्यात हाहाकार माजवून ‘तौक्‍ते’ रात्री गुजरातला धडकण्याची शक्‍यता

मुंबई – तौक्‍ते या चक्रीवादळाची तीव्रता वाढून ते अती गंभीर स्वरूपाचे बनले आहे. दिव आणि पोरबंदरच्या दरम्यान रात्री आकराच्या सुमारास ते जमीनीवर धडकण्याची शक्‍यता होती. गुजरातच्या दिशेने या वादळाने प्रस्थान ठेवण्यापुर्वी मुंबईत मुसळधार वृष्टी झाली.

कुलाबा येथील वेधशाळेत नोंदवले गेल्यानुसार दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वाऱ्याचा वेग ताशी 114 किमी होता. मुंबईत पावसाने दोन बळी घेतले त्यामुळे राज्यात मरण पावलेल्यांची संख्या दहावर पोहोचली. कोकण किनारावर्ती भागातून सुरक्षिततेचा उपाय म्हणून हजारो जणांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र, गुजरात, गोव्याचे मुख्यमंत्री आणि दमण दिवच्या नायब राज्यपालांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी वादळाला तोंड देण्यासाठी केलेल्या तयारीचा आढावा घेतला. वादळामुळे निर्माण होणाऱ्या तयारीचा पंतप्रधानांनी शनिवारीही आढावा घेतला होता.

तौत्के वादळामुळे कोकणामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून समुद्रात दोन जहाजे भरकटली आहेत. तीन जण रायगड जिल्ह्यात, तीन जण सिंधूदूर्ग जिल्ह्यात तर नवी मुंबई अणि उल्हासनगरमध्ये प्रत्येकी एक जण वादळामुळे मरण पावले.

सिंधूदूर्ग जिल्ह्यातील आनंदवाडी बंदरात नांगर टाकून असलेल्या दोन बोटी उलटून बुडाल्या. त्यात सात खलाशी होते. त्यातील देवगड तालुक्‍यातील राजाराम कदम या खलाशाचा मृत्यू झाला. तर अन्य तीन जण बेपत्ता आहेत. तीन जणांना वाचवण्यात यश आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

तौक्‍ते वादळामुळे सोमवारी कांडला आणि मुंद्रा यासह गुजरातमधील 21 बंदरांचे काम पुर्णपणे थांबवण्यात आले. यातील पाच बंदरांना या वादळाचा प्रत्यक्ष धोका निर्माण झाला आहे. तर 10 बंदरांना मोठा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या बंदरावर थांबलेल्या 28 जहाजांना सुरक्षितस्थळी जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वादळ घोंघावण्याची चाहूल गुजरातच्या दक्षिणेकडील किनारावर्ती भागात दुपारी पाच वाजण्यापासून मिळण्यास सुरवात झाली. सायंकाळी सहा वाजता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, भावनगर आणि पोरबंदरमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वहात होते.

द्वारकेत ताशी 22 किमी वेग नोंदवण्यात आला तर दिवमध्ये हा वेग 37 किमी नोंदवला गेला.
मुंबई विमानतळावरील सर्व ऑपरेशन्स रात्री उशीरापर्यंत ठप्प ठेवण्यात आली होती. मुंबईकडे येणारी इंडिगो आणि स्पाईसजेटची विमाने वळवण्यात आली. ते इंडीगोचे आणखी एक विमान लखनऊला परत पाठवण्यात आले.

मुंबई सकाळी साडे आठ ते दीड वाजेपार्यंत जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. कुलाब्यात 157 मिमि, जुहूत 157 मिमि, सांताक्रुझ 102 मिमि पावसांची नोंद झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.