पुणे – महापारेषणच्या रास्तापेठ जीआयएस (Gas Insulated Substation) 132 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रामध्ये शनिवारी सकाळी 8 ते रविवारी रात्री 8 वाजेपर्यंत देखभाल दुरुस्तीची विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे एकूण 6 उपकेंद्रांचा वीजपुरवठा 36 तास बंद राहणार आहे. परिणामी, मध्यवर्ती पेठांना फटका बसण्याची शक्यता आहे. या भागासाठी पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात येणार आहे.
महापारेषणच्या 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद राहणार असल्याने महावितरणला सुमारे 60 ते 65 मेगावॉट विजेचे भारव्यवस्थापन करावे लागणार आहे. सध्या हिवाळा तसेच शनिवारी व रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने विजेची मागणी कमी राहणार आहे.
त्यामुळे विजेचे भारव्यवस्थापन शक्य न झाल्यास किंवा पर्यायी व्यवस्थेमधील वीजवाहिनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास मध्यवर्ती परिसरात चक्राकार पद्धतीने दीड ते दोन तासांचे भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे. मात्र, ही परिस्थिती उद्भवू नये, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जाणार आहेत, असे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी म्हटले आह
या भागाला बसणार फटका
रास्तापेठ, पद्मावती व पर्वती विभाग अंतर्गत कसबा पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रविवार पेठ, बुधवार पेठ, रास्तापेठ, भवानी पेठ, नाना पेठ, जुना मोदी खाना, कॅम्पचा काही परिसर, गुलटेकडी, गंजपेठ, सॅलिसबेरी पार्क, घोरपडे पेठ, डायस प्लॉट, लोहियानगर, हाईडपार्क, महर्षीनगर, मुकुंदनगर या परिसरामध्ये भारव्यवस्थापन शक्य न झाल्यास किंवा वीजपुरवठ्यात तांत्रिक अडचण उद्भवल्यास चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागणार आहे.