वॉशिंग्टन – तैवान हा हल्ला होणारा पुढील देश असेल. तैवानकडे लक्ष असू द्या. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे तैवानकडे फार उत्साहाने पाहत आहेत, अशी टीप्पणी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
फॉक्स बिझनेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले. रशियाने ज्याप्रमाणे युक्रेनवर हल्ला केला आहे, त्याच धर्तीवर चीन हा सध्या स्वयंशासित असलेल्या तैवानवर हल्ला चढवील असा अंदाज वर्तविला जात आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यावरही थेट टीका केली. तैवानवर हल्ला होईल असे वाटण्यामागील मुख्य कारण म्हणजे गोंधळल्यासारखा अमेरिकेचा कारभार चालला आहे. त्यांना आपले नेते सक्षम वाटत नाहीत. त्यामुळे ते असे हल्ले करणार.
सध्या त्यांचा काळ सुरु आहे. शी जिनपिंग हे फार हुशार आहेत. अफगाणिस्तानमध्ये काय झाले हे त्यांनी पाहिले आहे. आपण कशापद्धतीने अफगाणिस्तान सोडले, आपली माणसे तिथे सोडली हे त्यांनी पाहिले. ते सर्व पाहत असून सध्या त्यांना मनासारखे करण्याची संधी मिळाली आहे.
असे ट्रम्प म्हणाले. तैवानच्या स्वातंत्र्याच्या दाव्याला अमेरिका पाठिंबा देत असून त्याची अमेरिकेला मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा मंगळवारी चीनने दिला. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी माजी संरक्षण अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ तैवानला पाठविले आहे. ते तैवानमध्ये दाखल झाले आहे.