प्रमाण वाढू लागले : स्टेट बॅंक मुख्य आर्थिक सल्लागारांची माहिती
पुणे – सप्टेंबरमध्ये छोट्या उद्योगांकडून कर्ज घेण्याचे प्रमाण वाढू लागल्याची आकडेवारी समोर आली आहे. छोट्या उद्योगांबरोबरच बिगर बॅंकिंग वित्तीय संस्थाकडून आणि घरासाठी कर्ज मागणीतही काही प्रमाणात वाढ झाली आहे.
स्टेट बॅंकेचे मुख्य आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष यांनी सांगितले, की सप्टेंबरमध्ये कर्जाच्या उठावात वाढ झाली आहे. जानेवारीपासून उद्योग क्षेत्राकडून घेतल्या जाणाऱ्या कर्जामध्ये वाढ झालेली नव्हती. मात्र, सप्टेंबरमध्ये या क्षेत्राला 9,700 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा झाला आहे. विशेष भाग म्हणजे, यातील 9 हजार 200 कोटी रुपये छोट्या उद्योगांनी घेतले आहेत.
त्याचबरोबर किरकोळ कर्ज वितरणातही 51,900 कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षातील या महिन्यातील कर्जापेक्षा हे प्रमाण दुप्पट आहे. त्याचबरोबर घरासाठी घेतलेल्या कर्जामध्येही जवळजवळ 2.5 पट वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने व्यवसायिक बॅंकांना बिगर बॅंकिंग वित्तीय कंपन्यांना सढळ हाताने कर्जपुरवठा करण्यास सांगितले आहे. सप्टेंबरमध्ये या कंपन्यांना बराच कर्जपुरवठा झाल्याचे दिसून येते, असेही त्यांनी सांगितले.
मात्र, या कालावधीत बरेच उत्सव असल्यामुळे हा कर्जपुरवठा वाढला असण्याची शक्यता आहे. दीर्घ पल्ल्यात तेवढीशी आशादायक परिस्थिती नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी केले.
दुसरी बाजू काय?
रोजगार निर्मिती वाढल्याशिवाय ग्राहकाच्या मनात खरेदीची इच्छा निर्माण होणार नसल्याचे त्यांनी सूचित केले. नोटाबंदी आणि जीएसटीनंतर विविध क्षेत्रातील नवे प्रकल्प कमी झाले आहेत. त्याचबरोबर आहेत या प्रकल्पातील मनुष्यबळ कमी करण्यावर कंपन्यांचा भर आहे. त्यामुळे ग्राहकात खरेदीची किंवा कर्ज काढण्याची ईच्छा कमी झाली आहे.