पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधितांची संख्या कमी होत असून, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, ग्रामीण भागात अद्याप संसर्ग वाढतच आहे. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यातील निर्बंध 1 जूनपर्यंत वाढवण्यात आले आहेत. नागरिकांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी परिषदेत केले.
संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, पुणे जिल्ह्यातील ऑक्सिजन निर्मिती क्षमता वाढविण्याच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये 1 हजार 200 मेट्रिक टनाची क्षमता आहे. त्यामध्ये आणखी 1 हजार 800 ने वाढ करून ती 3 हजार मेट्रिक टनांपर्यंत घेऊन जाण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 44 ऑक्सिजन प्लांटला परवानगी देण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे महापालिका हद्दीत 8, पिंपरी-चिंचवडमध्ये 7 तर ग्रामीणमध्ये 29 प्लांट उभे राहणार आहेत. त्यातील चार प्लांट सुरू झाल्याचे पवार यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळेच रुग्ण घटले
काही संस्था, प्रकाशकांकडून ऑनलाइन परवानगी मिळावी अशी मागणी होत आहे. त्यावर पवार म्हणाले, ऑनलाइन परवानगीसाठी सगळेच मागे लागलेत. मात्र, तसे झाले तर आपल्या मागे करोना संसर्ग सुरू होईल. लॉकडाऊन लावायला आम्हालाही बरं वाटत नाही. ज्यावेळी निर्णय घेतला, त्यावेळी किती जणांची नाराजी सहन करावी लागली हे आम्हालाच माहिती. पुण्यात लॉकडाऊनचा कठोर निर्णय घेतल्यामुळे आज बाधित संख्या कमी झाल्याचे केंद्रातले अधिकारी बोलतात, असे पवार यंनी सांगितले.
ऑडिटसाठी कोणी नकार देत असतील, तर कारवाई करा…
जिल्ह्यात फायर ऑडिटसह इलक्ट्रिक आणि ऑक्सिजन ऑडिट सुरू आहे. त्यामुळे अनेक त्रुटी समोर आल्या. त्यामध्ये दुरूस्ती करण्याचा सूचना दिल्या आहेत. मात्र, काही रूग्णालयांकडून ऑडिट करणाऱ्याला टीमला आत येऊन दिले नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत पोलिसांना याबाबत सूचना देत, परवानगी न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करावी. तसेच रूग्णालयांनी ऑडिटसाठी पथकांना सहकार्य करावे, असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.