मुंबई – ऑक्टोबरपासून परकीय चलन बाजारामध्ये कमालीची अस्थिरता आहे. त्यामुळे भारतात येणार्या थेट परकीय गुंतवणुकीवर आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. मात्र रिझर्व्ह बँकेने या कालावधीत आवश्यक तेथे हस्तक्षेप केल्यामुळे याचा जास्त परिणाम भारतीय भांडवल बाजारावर किंवा गुंतवणुकीवर झाला नसल्याचे रिझव्हर्र् बँकेच्या एका अभ्यास अहवलात नमूद करण्यात आले आहे.
रिझव्हर्र् बँक वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन स्पॉट आणि फॉरवर्ड मार्केटमध्ये हस्तक्षेप करीत असते आणि आगामी काळातही करत राहणार असल्याचे सांगण्यात आले. अमेरिकेत घडत असलेल्या घटनांमुळे डॉलर बळकट होत आहे. अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत आहे. चीनमध्ये मंदिसद़ृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जगात दोन युद्ध चालू आहेत. अशा परिस्थितीमध्ये चलन बाजारात विशिष्ट चलनाची मागणी अचानक कमी किंवा जास्त होत आहे. त्याचा इतर सर्व चरणावर त्या प्रमाणात परिणाम होत असतो. त्याकडे रिझर्व्ह बँकेचे बारीक लक्ष आहे. वेळोवेळी रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असतो.
तरीही ऑक्टोबरपासून भारतीय चलनावर परिणाम वाढला आहे. 10 जानेवारी रोजी संपलेला आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा आठ अब्ज डॉलरने कमी होऊन 625 अब्ज डॉलर झाला आहे. त्या अगोदरच्या आठवड्यात चलन साठा पाच अब्ज डॉलरने कमी झाला होता. सप्टेंबर अखेरीस जागतिक भांडवल बाजारात सुलभता होती. त्यामुळे भारताकडील परकीय चलन साठा 702 अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर गेला होता.
परकीय चलन साठा बराच कमी झाला असला तरी त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला कसलाही धोका नाही. भारताची परकीय कर्ज परतफेडची क्षमता कायम आहे. भारताला आयातीसाठी पुरेसे परकीय चलन स्वतःकडे आहे.