लंडन : जगातील सर्वच शेअर बाजार “कोविड -19′ च्या प्रादुर्भावाच्या भीतीने कालच कोसळले होते. मात्र अमेरिकेने आर्थिक उत्तेजन देण्याच्या पार्श्वभूमीवर आज आशियाई आणि युरोपियन शेअर बाजारांमध्ये सकारात्मक वातावरण दिसून आले.
कच्च्या तेलांच्या किंमती पण आज 8 टक्क्यांनी वाढल्या. युरोपातील तीन प्रमुख शेअर निर्देशांकापैकी लंडनस्थित एसटी एसई 3 टक्क्यांनी, पॅरिसचा सीएसी 2 टक्क्यांनी तर फ्रॅंकफर्टचा डीएएल्स 2 टक्क्यांनी वधारला. 1991 साली झालेल्या पडझडीनंतर कालची पडझड सर्वात अधिक होती. गुंतवणूकदार त्याला “ब्लॅक मंडे’ म्हणून संबोधत आहेत.
दरम्यान सौदी अरेबिया आणि दुबईच्या बाजारांमध्ये पाच टक्क्यांनी तर रशियन बाजारांमध्ये दहा टक्क्यांनी वाढ झालेली दिसली. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी करोनाग्रस्त “वुहान’ या शहराला भेट दिल्यानंसुद्धा शेअर बाजारांमध्ये सकारात्मकता दिसली.
दरम्यान करोना विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला 2 अब्ज अमेरिकन डॉलर्स एवढे नुकसान होण्याची भीती अमेरिकन व्यापार विकास संस्थेने व्यक्त केली आहे.