रामराजे नाईक निंबाळकर यांची माहिती
फलटण (प्रतिनिधी) – फलटण अतिरिक्त औद्योगिक वसाहत विकसित करण्याच्या उद्देशाने सकारात्मक चर्चा झाली असून जमिनीच्या दराबाबतचा विषय शासन व शेतकरी यांच्यातील समन्वयातून सोडविताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी मध्यस्थी करुन योग्य निर्णय घेणार आहे, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
कमिन्स आंतरराष्ट्रीय कंपनीच्या माध्यमातून सुरवडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्पांची उभारणी होऊन कामकाज सुरु झाले आहे. तालुक्याला त्याचा लाभ मिळत असतानाच अतिरिक्त औद्योगिक वसाहत क्षेत्र विकसित करण्याच्या दृष्टीने पंचायत समिती सभागृहात नांदल, मिरगाव, ढवळेवाडी, सुरवडी, निंभोरे येथील शेतकऱ्यांच्या बैठकीत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभेदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती कदम, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोल्हापूरचे विभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंता आणि संबंधित शेतकरी उपस्थित होते.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरवडी येथील औद्योगिक वसाहत विकसित झाल्यानंतर तेथे कमिन्स आंतरराष्ट्रीय कंपनीचे 7/8 प्लॅंट उभारण्यात आले असून या कंपनीच्या माध्यमातून काही तरुणांना रोजगार, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून कमिन्सच्या सहकार्याने अभियांत्रिकी शिक्षणाची संधी उपलब्ध झाल्या असून औद्योगिक विकासाला गती प्राप्त झाल्याने तालुक्यातील आर्थिक क्षेत्र काही प्रमाणात गतीमान करण्याचे प्रयत्न आहेत. अतिरिक्त क्षेत्र विकसित करुन तेथेही औद्योगिक उत्पादन सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहोत. आजच्या बैठकीत शेतजमीन मालकांनीही सकारात्मक भूमिका घेतली असल्याने आगामी काळात ही वसाहत उत्तम प्रकारे विकसित करण्याला आपले प्राधान्य राहिल, याची ग्वाही रामराजे यांनी दिली.
वरील चार- पाच गावांतील सुमारे 300 एकर क्षेत्र अतिरिक्त औद्योगिक वसाहत म्हणून विकसित करण्याचा महामंडळाचा प्रयत्न असल्याचे आजच्या बैठकीत स्पष्ट झाले आहे. या जमिनी अधिगृहीत करताना शेतकऱ्यांना द्यावयाच्या मोबदल्यामध्ये शासन व शेतकरी यांच्यामध्ये योग्य समन्वयाने मार्ग काढला जाईल. शेतकऱ्यांचे नुकसान न होता ही प्रक्रिया व्यवस्थित पार पाडून फलटणच्या औद्योगिक वसाहतीची विस्तारवाढ करण्याची आवश्यकता आहे. आगामी काळात सर्वांच्या सहकार्याने त्यामध्ये निश्चित यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.