पौष, जिजामाता आणि शककर्ते शिवराय

पौष हा मोठा भाग्याचा मास! आपल्या दुसऱ्याच तिथीला- पौष शुद्ध द्वितियेला विदर्भातील कारंजा नगरीत गुरुभक्तीची परंपरा पुन्हा प्रवाही करणाऱ्या नृसिंह सरस्वती स्वामी, श्री गुरु महाराज, यांचा दत्तावतार दिला!  आपल्या सगळ्या माय भगिनी या मासात एका वेगळ्याच आनंदात असतात. संक्रांतीचे वाण देणे, हळदी-कुंकू, तिळगूळ, एकमेकींची ओटी भरणे यात त्यांची संध्याकाळ वेगळेच तेज घेऊन येते. तसाही हा तेज प्रदान करणारा मास! सूर्य देवाची उपासना करून रथ सप्तमीला सूर्य नमस्कार घालून आरोग्य प्राप्ती, बल प्राप्ती केली जाते.

अशा या पवित्र मासात मनाचे भावबंध जोडले जातात ते सिंदखेड राजा येथील जिजाऊ जन्मस्थानाशी! होय, हे जन्मस्थान तर इतिहासाला ज्ञात होते पण आऊसाहेबांची जन्मतिथी मात्र अज्ञात होती. ही सल दूर करणारे शिवचरित्र म्हणजे “शककर्ते शिवराय’. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरक इतिहास अनेक चरित्रकारांनी अभ्यासपूर्वक मांडून या चरित्राचे विविध पैलू समोर आणलेत. तद्वतच जिजाऊ जन्मतिथी सप्रमाण पुढे आणून मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे भव्य असा जिजामाता जन्मोत्सव घेऊन या स्थानाचा जीर्णोद्धार सुरू करण्याचे महत्कार्य शिवकथाकार विजयराव देशमुख उपाख्य आणि प. पू. सद्‌गुरूदास महाराज लिखित शककर्ते शिवराय या ग्रंथाने केले. सगळ्या शिवप्रेमींना हवेहवेसे वाटणारे हे चरित्र! पण लेखकांची विजयराव देशमुख आणि सद्‌गुरूदास महाराज अशी दोन नावे शिवप्रेमींना जरा बुचकळ्यात टाकतात. हा गोंधळ जर मनात निर्माण झाला तर निष्कारण आपण एका अतिशय अधिकृत आणि अस्सल शिवचरित्रापासून दुरावतो. एका शिवभक्ताने हा मनातला प्रश्‍न विजयरावांना विचारला, तेव्हा ते उत्तरले, “यात गोंधळ होण्याचे काहीच कारण नाही. छत्रपती शिवाजीमहाराज हे “श्रीमंत योगी’ होते. त्यांचा मूळ पिंड वैराग्यशील होता. सतत त्यांच्या चरित्राचा ध्यास घेऊन त्यांचे नाव घेता घेता, माझा अध्यात्मिक प्रवास सुरू होऊन मी सद्‌गुरूदास झालो, जर अंतःकरणपूर्वक शिवभक्ती केली, कुठलीही लौकिक प्रसिद्धी अथवा अपेक्षा न ठेवता, तर हे होणे नैसर्गिक आहे. तेच माझ्या जीवनात घडले!’

अर्थात केवळ इतिहास म्हणून अभ्यास करायचा असतो, तेव्हा ग. ह. खरे यांचे मत महत्त्वाचे ठरते. ते म्हणतात, “सत्य कथनाचे बाबतीत प्रथम क्रमांक शककर्ते शिवराय या चरित्राचा!’ यात लेखकांनी आपला श्रद्धाभाव बाजूला ठेवून पूर्वग्रहरहित बुद्धीने साक्षेपी लेखन केले आहे. म्हणूनच आजही हे चरित्र विद्वान आणि सामान्य जनात सारखेच मान्य आहे. शिवचरित्राचे प्रसंग जिथे घडले, त्या स्थळांची भौगोलिक पाहणी करून त्यांनी आपले निष्कर्ष तपासून घेतले आहेत. अशाच एका शुभ घडीला त्यांना जिजाऊ जन्माचा उल्लेख सापडला. जाधवरावांच्या पदरी असलेले रामसिंग भाट व बजरंग भाट यांचे एक कवन! यात म्हटले आहे-
“”जगदंब कृपेने झाली मुलगी म्हाळसाराणीला,
तीच जिजामाता हो प्रसिद्ध सर्वाला,
फसली सन 1007 ला,
पौष पौर्णिमा सूर्योदयाला!”
या उल्लेखानुसार जिजामाता जन्म सिंदखेड राजा येथे फसली सन 1007 चे पौषी पौर्णिमेला सूर्यादय समयी, म्हणजे गुरुवार दिनांक 12 जानेवारी 1598 रोजी सकाळी झाला. त्या दिवशी पुष्य नक्षत्र होते. म्हणजे गुरू पुष्याचे सुमुहूर्तावर जिजामाता यांचा जन्म झाला. शककर्ते शिवराय खंड1- परिशिष्ट क्रमांक 1 यात लेखकांनी हिजरी व फसली कालगणना या फसली अमरदाद महिन्यात लखुजीराजे यांनी गावजेवण दिल्याचा उल्लेख हा पौष पौर्णिमा या तिथीशी कसा जुळतो ते सप्रमाण सिद्ध केले आहे.
विजय देशमुख म्हणतात, “”महाराज! जिवंतपणा, जागेपणा, बाणेदारपणा, ईश्‍वरपणा वृत्ती या गुण समुच्चयाचे सगुण रूप असलेल्या जिजाबाई साहेबांचे पोटी जन्म घेऊन असं एक हिंदवी स्वराज्य आपण आम्हाला दिलंत की,
* वैराग्याची छाटी हाच जिथला झेंडा होता!
* हर हर महादेव हाच जिथला महामंत्र होता!
* सह्याद्रीच्या कुशीतील गोरगरीब मावळे हेच जिथलं बळ होतं!
* “हे राज्य श्रींचे’ हाच जिथला अढळ विश्‍वास! आणि
* महाराष्ट्र धर्म वाढविणे हाच जिथला कर्म योग होता!
या हिंदवी स्वराज्याच्या आदर्शानुरुप नवे राष्ट्रशिल्प घडविण्याची जिद्द आमच्या अंतःकरणात स्फुरण पावू द्या…
या कळकळीच्या प्रार्थनेसह हे शब्दबिल्व आपल्या चरणी समर्पित!’
या अपर्ण पत्रिकेतील आर्जव, प्रार्थना आज जिजाऊचरणी करावीशी वाटतेय!
“आऊसाहेब, आपल्यातील गुण आमच्या जीवनात बाणू द्या, तरच आमची शिवत्वाकडे वाटचाल सुरू होऊ शकेल आणि तेव्हाच आम्हाला महाराज कळू शकतील!’

मोहन बरबडे

Leave A Reply

Your email address will not be published.