लैंगिक अत्याचारात जामीनावर सुटलेल्याने केला महिलेचा विनयभंग

मुंबईच्या अंधेरी उपनगरात घडला गुन्हा

मुंबई – महिला अत्याचारविरोधातील “पॉस्को’ कायद्याअंतर्गत जामीनावर सुटलेल्या आरोपीने आपल्या जुन्याच खोड्या कायम ठेवत चालू रिक्षामध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याने त्याला नव्या गुन्ह्यात अटकर करण्यात आली. मुंबईच्या अंधेरी उपनगरात हा गुन्हा घडला आहे.

सदर अत्याचार पिडीत महिला अंधेरीच्या गोंदावली बायपासजवळ, पश्‍चिम द्रुतगती मार्गावर घरी जाण्यासाठी उभी होती. त्यावेळी सदर आरोपीने रिक्षातून सोडण्याचे आमिष सदर महिलेला दाखवले. शेअर ऑटोने तुमचे पैसेही वाचतील, असे सांगितले. या रिक्षामध्ये आणखी एक सहप्रवासी बसलेला दिसल्याने ही पहिला सवारी घेण्यास तयार झाली.

मात्र, रिक्षा थोड्या अंतरावर गेल्यावर रिक्षाचालक अनिकेत जयस्वाल मागे महिलेजवळ येऊन बसला आणि त्याचा साथीदार असलेला सूर्यकुमार राजभर रिक्षा चालवू लागला. सदर महिलेने यास हरकत घेतली असता जयस्वालने तिच्याशी लगट सुरु केली. महिलेने मदतीसाठी हाका मारल्या, आरडाओरडाही केला. मात्र रस्ता सुनसान असल्याने कोणीही मदतीला आले नाही.

अखेर धाडस करुन स्वत: ला वाचवण्यासाठी हताश झालेल्या या महिलेने चालत्या रिक्षातून उडी मारली. तिच्या डोक्‍याला आणि हाताला किरकोळ जखम झाली. मात्र तिने तडक अंधेरी पोलिस स्टेशन गाठले. रिक्षाचा नंबर पोलिसांना दिला. तिने सांगितलेल्या वर्णनावरुन आरोपीचे चित्र बनवले असता, सदर आरोपी अनिकेत जयस्वाल असल्याचे सिद्ध झाले.

पोलिसांनी तातडीने अनिकेत जयस्वाल आणि त्याचा साथीदार सूर्यकुमार राजभर यांना अटक केली. त्यावेळी अनिकेत जयस्वाल याच्यावर आधीच लैंगिक गुन्हेगारीच्या कलमाखाली एक खटला सुरु असल्याचे समजले. एक वर्षापूर्वी त्याला त्या प्रकरणात जामीन मिळाला होता. मात्र, आपल्या वागण्यात सुधारणा न केल्याने अनिकेत जयस्वाल आणखी एका खटल्यात अडकला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.