पुणे – कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला तपासणीसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने हे सीसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या ठिकाणी घेण्यात आले आहेत, अशी माहिती या गुन्ह्याच्या तपास अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. ३०) न्यायालयात दिली. रक्ताचे नमुने घेतलेल्या ठिकाणाचा पंचनामा देखील करण्यात आल्याचे त्यांनी न्यायालयात सांगितले. ( Porsche Car Accident Case)
ज्या ठिकाणी मुलाचे रक्ताचे नमुने घेण्यात आलेले आहे, त्याच्या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये डॉ. श्रीहरी हाळनोर आणि गटकांबळे यांच्यासह काही साक्षीदार दिसून आले आहेत. डॉ. तावरे, डॉ. हाळनोर आणि घटकांबळे त्यांच्यामध्ये रक्ताचे नमुने घेण्याच्या वेळी विविध माध्यमांमधून संवाद झालेला आहे. तसा सीडीआर देखील जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयास दिली.
कोठडीत पाच जूनपर्यंत कोठडीत वाढ –
कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मोटार चालकाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठीडत न्यायालयाने पाच जूनपर्यंत वाढ केली आहे. या गुन्ह्यात कलमवाढ देखील करण्यात आली आहे.