लोकसंख्या नियंत्रण धार्मिक मुद्दा नाही

पाटणा – लोकसंख्येचे नियंत्रण हा काही धार्मिक अथवा राजकीय मुद्दा नाही. तर तो विकासाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे देशात लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याच्या संदर्भात कायद्याची गरज असल्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा फेरविस्तार केला गेल्यानंतर गिरिराज सिंह यांच्याकडे ग्रामविकास खात्याचे जबाबदारी देण्यात आली आहे.

त्यानंतर बिहारच्या बेगुसराय येथील आपल्या गावी आल्यावर त्यांचे आज भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, देशाच्या विकासासाठी लोकसंख्येचे स्थिरिकरण आवश्‍यक आहे. त्यामुळेच याबाबतचा कायदा समाज आणि देशाच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे. आज चीन देशात मिनीटाला सरासरी 10 मुले जन्माला येतात. मात्र भारतात तेच प्रमाण सरासरी 31 ते 33 इतके आहे.

त्यामुळेच हा कायदा आवश्‍यक ठरतो. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने या कायद्याचा मसूदा तयार करून चांगले पाउल उचलले असून त्याकरता मी त्यांचे आभार मानतो. हे महत्वूपूर्ण पाउल असून हा विषय जात, धर्म आणि राजकारण यापासून लांबच ठेवला गेला पाहिजे.

दरम्यान, मंत्रिमंडळात त्यांच्यावर सोपवण्यात आलेल्या नव्या जबाबदारीबाबत गिरिराज म्हणाले की जबाबदारी ही जबाबदारीच असते. त्यात लहान मोठे असे काही नसते. पंतप्रधानांनी आपल्याकडे पंचायत राज आणि ग्रामविकास खात्याची जबाबदारी दिली आहे व त्याबाबत आपण त्यांचे आभार मानतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.