नजाफ (इराक)- ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फान्सिस यांनी आज इराकमधील शिया समाजाचे वरिष्ठ धर्मगुरू ग्रॅन्ड आयतुल्ला अली अल सिस्तानी यांची भेट घेतली. धार्मिक कट्टरवाद, संप्रयादवाद आणि हिंसाचाराने ग्रस्त इराकमध्ये इस्लाम आणि ख्रिश्चन या दोन्ही धर्मांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरणात सहजीवन रहावे, यासाठी त्यांनी आवाहन केले. असे आवाहन पोप यांनी केल्यामुळे ही भेट ऐतिहासिक अशा स्वरुपाची ठरली.
इराकमधील हिंसाचार आणि युद्धग्रस्त वातावरणातच दक्षिणेकडील नजाफ शहरात पोप आणि सिस्तानी यांची ही ऐतिहासिक भेट झाली. पोप यांच्या इराक दौऱ्याबाबत आंतरराष्ट्रीय पातळीवरून आश्चर्य व्यक्त केले गेले होते. तसेच या दौऱ्यात पोप यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असा सावधगिरीचा इशाराही दिला गेलेला होता. इराकमधील परिस्थिती सुधारण्यासाठी पोप यांनी स्वतः दौरा करावा, हे देखील ख्रिश्चन धर्मातील अनेक श्रेष्ठींना पटलेले नव्हते. मात्र पोप यांनी सर्व विरोध न जुमानता या दौऱ्यावर जाण्याचे निश्चित केले. त्यानुसार शिया संप्रदायातील वरिष्ठ धर्मगुरूंची त्यांनी आज भेट घेतली आणि धार्मिक सलोख्यासाठीचे आवाहनही केले. या भेटीसाठी पोप यांचे आगमन होत असताना रस्त्याच्या दुतर्फा मुले उभी राहिली होती आणि त्यांनी इराक आणि व्हॅटिकन सिटीचे ध्वज हातात धरून पोप यांना अभिवादन केले.
आंतर-धार्मिक संवाद साधण्यासाठी पोप यांनी तुर्की, जॉर्डन, इजिप्त, बांगलादेश, अझरबैजान, संयुक्त अरब अमिराती आणि पॅलेस्टाईन प्रांतांसह मुख्यत: मुस्लिम देशांची भेट घेतली आहे.