वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या हस्ते शनिवारी ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांना प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम विथ डिस्टिंक्टक्शन या अमेरिकेच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले. पोप हे संपूर्ण जगाला प्रकाशमान करणाऱ्या विश्वास, आशा आणि प्रेमाचे प्रकाशकिरण असल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे.
रोम येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून बायडेन यांच्या हस्ते पोप यांना शनिवारी हा पुरस्कार प्रदान केला जाण्याचे नियोजन होते. अमेरिकेचे अध्यक्ष या नात्याने बायडेन यांची ही अखेरची विदेशवारी ठरणार होती. मात्र कॅलिफोर्नियात लागलेल्या वणव्याच्या मदतकार्यावर देखरेख करण्यासाठी बायडेन यांनी हा विदेश दौराच रद्द केला.
बायडेन यांनी फोनवरून पोप यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना आबासी पद्धतीने हा पुरस्कारप्रदान केला, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. पोप यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान बायडेन यांनी जगभर शांततेला प्रोत्साहन देणे आणि दुःख कमी करण्याच्या प्रयत्नांबद्दल चर्चा देखील केली.
विशेष उल्लेखनीय कार्यासाठी प्रेसिडेन्शियल मेडल प्रदान करण्याची बायडेन यांची अध्यक्षपदाच्या कार्यकाळातली ही एकमेव वेळ आहे. आठ वर्षांपुर्वी बराक ओबामा यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात उपाध्यक्ष असताना बायडेन यांना स्वतःलाही या विशेष उल्लेखनीय कार्यासाठीच्या प्रेसिडेन्शियल मेडलने सन्मानित करण्यात आले होते. ओबामा यांच्या दोन टर्मच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी केवळ एकदाच या पुरस्काराने कोणाला सन्मानित केले होते.
पोप यांना प्रदान करण्यात आलेल्या सन्मानपत्रामध्ये त्यांनी गरिबांची सेवा करण्यासाठी केलेल्या कार्याचे कौतुक केले गेले आहे. पोप यांच्या गरिबांच्या सेवेत कधीही खंड पडला नाही. देवाबद्दल लहान मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अत्यंत आनंदाने आणि समर्पक उत्तरे दिली. एक आव्हानात्मक शिक्षक या नात्याने त्यांनी आपल्याला शांतीसाठी लढण्याची आणि पृथ्वीचे रक्षण करण्याची आज्ञा दिली.
वेगवेगळ्या धर्मांपर्यंत पोहोचणारे ते एक एक स्वागतार्ह नेता आहेत, असे या मानपत्रामद्ये म्हटले आहे. बायडेन २० जानेवारीला अध्यक्षपदाची सूत्रे रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सोपवणार आहेत. त्यांनी अलिकडच्या आठवड्यात समर्थक आणि सहयोगींसह प्रमुख व्यक्तींना सन्मानित केले आहे. आपल्या अध्यक्षपदाच्या समारोपाच्या भाषणाचीही तयारी त्यांनी सुरू केली आहे.