पोप फ्रांसिस यांची युद्धग्रस्त मोसुल शहराला ऐतिहासिक भेट

मोसुल,(इराक) – युद्धजन्य स्थितीमुळे इराक मधील ज्या मोसुल शहराची वाट लागली आहे त्या मोसुल शहराला आज सर्वोच्च ख्रिश्‍चन धार्मिक नेते पोप फ्रांसिस यांनी भेट दिली. या शहरातील ख्रिश्‍चन नागरीकांची इस्लामिक स्टेटच्या गनिमांनी मोठ्याप्रमाणावर हत्याकांडे केल्यामुळे ख्रिश्‍चन नागरीकांनी येथून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले आहे. आज तेथे जेमतेम सत्तर ख्रिश्‍चन कुटुंबे कशी तरी तग धरून आहेत. आज ते लोक पोप यांच्या स्वागताला हजर होते. स्थानिक मुस्लिम नागरीकांनीही पोप यांचे स्वागत करून धार्मिक सलोख्याचे वातावरण या युद्धग्रस्त शहरात प्रस्थापित केले.

मोसुल मधील चौकात उभारलेल्या व्यासपीठावरून पोप यांनी शांतता आणि ऐक्‍याचा संदेश दिला. या शहरातील एकमेव ख्रिश्‍चन धर्मगुरू रेव्हरंड रिड कालो यांनी यावेळी पोप यांचे स्वागत करताना आपलेही काही अनुभव कथन केले. ते म्हणाले की, इस्लामिक स्टेटच्या गनिमांनी या शहराचा ताबा घेतल्यानंतर बहुसंख्य ख्रिश्‍चन नागरीकांप्रमाणेच मीही जून 2014 मध्ये मोसुलहून अन्यत्र पळून गेलो. पण या शहरावर इराक आणि आंतरराष्ट्रीय समुदायांच्या फौजांनी पुन्हा ताबा मिळवून इस्लामिक स्टेटच्या गनिमांना येथून घालवून दिल्यानंतर मी येथे पुन्हा परतलो. येथे जेमतेम 70 ख्रिश्‍चन कुटुंबे राहात आहेत.बाकीच्या नागरीकांनी येथे पुन्हा परतण्यास नकार दिला आहे. त्यांच्यातील अनेकांनी विदेशात स्थलांतर केले आहे.

पोप यांच्या या स्वागत समारंभात येथील मुस्लिम समुदायाचे नेते गुतायबा आघा यांचेही भाषण झाले. त्यांनी मोसुलच्या सर्व ख्रिश्‍चन बांधवांना पुन्हा या शहरात येऊन स्थायिक होण्याचे आवाहन केले. हे त्यांचेही शहर आहे. त्यांनी त्यांच्या येथील मालमत्तांचा पुन्हा ताबा घ्यावा आणि आपले पुर्वीचे व्यवसाय सुरू करावेत असे आवाहनही त्यांनी केले. पोप यांची ही मोसुल भेट धार्मिक सद्‌भावना व बंधुत्व कायम राखण्यासाठी होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.