व्हॅटिकन – गेले काही दिवस थंडीतापाने आजारी असलेले पोप फ्रांसिस यांची करोना चाचणी घेण्यात आली. पण या चाचणीत त्यांना करोना विषाणुंची बाधा झालेली नाही असे स्पष्ट झाले आहे. एका इटालियन वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे. पण व्हॅटिकन सिटीच्या प्रवक्त्याने मात्र त्यावर काहीही भाष्य केलेले नाही.
पोप यांनी गेल्या आठवड्यातील आपले सारे जाहीर कार्यक्रम रद्द केले होते. त्यामुळे शंकाकुशंका उपस्थित केल्या जात होत्या. करोना विषाणुंचा संसर्ग जगातील अनेक देशांना झाला आहे.
इटालितही या रोगाची तब्बल 2 हजार लोकांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोप यांचीही करोनाची चाचणी घेण्यात आली होती. पण ती निगेटीव्ह आल्याने सर्वांनीच सुस्कारा सोडल्याचे सांगितले जात आहे. 83 वर्षीय पोप हे थंडीताप व खोकल्याने आजारी आहेत.