व्हॅटिकन सिटी – ख्रिश्चन धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप यांनी काल 13 नवीन कार्डिनलची नियुक्ती केली. त्यामध्ये आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या पहिल्या कार्डिनलचाही समावेश आहे. यामुळे भविष्यात पोप यांचे वारसदार म्हणून या कार्डिनलपैकी एकाची नियुक्ती होण्याची शक्यताही वाढली आहे.
“कन्सिस्टरी’ नावाच्या एका विशेष समारंभात या कार्डिनलची नियुक्ती करण्यात आली. कोविड-19 च्या साथीमुळे या विशेष समारंभाचे स्वरुप फारच मर्यादित आणि छोटेखानी राखण्यात आले होते. सेंट पीटर्स बॅसिलिका इथे झालेल्या अशा विशेष समारंभाला नेहमी हजारो लोकांची उपस्थिती असते. मात्र आज झालेल्या समारंभासाठी केवळ 10 जण उपस्थित होते. नियुक्ती झालेल्या कार्डिनलपैकी 10 जणांना पोप यांच्या हस्ते पवित्र अंगठी आणि बिरेटा नावाने ओळखली जाणारी हॅट प्रदान करण्यात आली.
आज निवड झालेल्या 13 पैकी 9 जण 80 वर्षांखालील आहेत. चर्चच्या कायद्यांनुसार ते भावी पोपच्या निवडीसाठी आपले मत नोंदवू शकतात. पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर अथवा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर भाअवी पोपच्या निवडीसाठी गुप्त परिषदेचे आयोजन केले जाईल. त्या परिषदेला हे सर्वजण उपस्थित राहू शकणर आहेत.
पोप फ्रान्सिस हे 2013 साली पोप पदावर नियुक्त झाले होते. तेंव्हापासून पोप यांनी आतापर्यंत 7 वेळा “कन्सिस्टरी’चे आयोजन केले आहे. आतापर्यंत त्यांनी 18 कार्डिनलची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये आतापर्यंत ख्रिश्चन धर्मियांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी प्रतिनिधीत्व न झालेल्या देशांमधील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
यातील बहुतेक जण विक्सनशील देशांमधील आहे. काल इटली, माल्टा, रवांडा, अमेरिका, फिलिपिन्स, चिली, ब्रुनेई आणि मेक्सिको येथील प्रतिनिधींना कार्डिनल म्हणून निवडले गेले आहे. त्यातील रवांडा आणि ब्रुनेईच्या प्रतिनिधींना प्रथमच निवडण्यात आले आहे.कार्डिनल म्हणून निवडले गेलेले अमेरिकेतील 72 वर्षीय विल्टन ग्रेगरी हे आफ्रिकन-अमेरिकन वंशाचे पहिलेच प्रतिनिधी आहेत.