पुणे – करोनाच्या उपचारासाठीचे रेमडिसिवीर इंजेक्शन आता गरीब रुग्णांना स्वस्तात उपलब्ध होणार आहे. शासनाने गरीब रुग्णांसाठी रेमडिसिवीर इजेक्शन 2 हजार 360 रुपयात देण्याचा निर्णय घेतला आहे.
करोनाच्या उपचारासाठी रेमडिसिवीर या इंजेक्शनचे उत्पादन करण्यासाठी ठराविक औषध उत्पादक कंपनींना परवानगी दिली आहे. या औषधांची उत्पादन क्षमता व मागणीमध्ये तफावत आहे. त्यामुळे बाजारात या औषधांचा तुटवडा असल्याने गरजू रुग्णांना वेळेत ही औषधे मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या.
या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने रेमडिसिवीर इंजेक्शन कोणत्या रुग्णाला द्यायचे याबाबतची आचारसंहिता निश्चित केली आहे.
पुणे विभागात 2 लाख 94 हजार 84 इंजेक्शनची विक्री झाली असून सद्य:स्थितीत 8 हजार 107 रेमडिसिवीर इंजेक्शनचा साठा शिल्लक आहे. गरीब रुग्णांसाठी राज्य शासनाकडून दररोज 750 इंजेक्शन उपलब्ध होत आहे. यामध्ये पुण्यासाठी 250, सातारा 100, सांगली 100, सोलापूर 150 आणि कोल्हापूरसाठी 150 इंजेक्शन उपलब्ध होत आहे.