पुणे – लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयात (सीएमई) प्रशिक्षणादरम्यान पूल पडून झालेल्या दुर्घटनेबाबत सविस्तर चौकशी करण्यासाठी लष्कराने “कोर्ट ऑफ इन्क्वायरी’चे आदेश दिले आहेत. यासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात आली असून, समितीतर्फे चार दिवसांत या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर केला जाणार आहे.
“सीएमई’मध्ये लष्करी अभियांत्रिकीच्या विविध तुकड्यांमधील जवानांना युद्धकालीन अभियांत्रिकीचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यासाक्रमांतर्गत गुरूवारी (दि.26) जवानांना पूलबांधणीचे प्रशिक्षण दिले जात होते.
यावेळी पुलाचा आधार असलेला टॉवर कोसळल्याने त्याखाली सुमारे दहा ते बारा जवान अडकले होते. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर नऊ जण जखमी झाले आहेत. ही एक गंभीर घटना असून, नेमकी काय चूक झाली? याबाबत चौकशी करण्यासाठी लष्करातर्फे कोर्ट ऑफ इन्क्वायरी केली जाणार आहे.
यासाठी नेमलेल्या समितीत एक कर्नल रॅंकचा अधिकारी आणि युद्धकालीन अभियांत्रिकी विषयात तज्ज्ञ असलेल्या तीन लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीतर्फे प्रशिक्षणावेळी उपस्थित असणारे निरीक्षक, प्रात्यक्षिकात सहभागी असणारे जवान आणि कार्मचारी यांची चौकशी केली जाणार आहे. घडलेली घटना ही तांत्रिक कारणामुळे झाली आहे, की मानवी चुकीमुळे हे या चौकशीतून निषन्न होईल, असे लष्कर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.