रांची – मनरेगा घोटाळ्याप्रकरणी झारखंडमधील निलंबित आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांच्याशी संबंधित ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीकडून पुन्हा एकदा छापेमारी करण्यात आली आहे. यावेळी ईडीने सिंघल यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या मोहम्मद अन्सारीच्या हजारीबाग येथील घरातून तीन कोटी रुपयांची रोकड जप्त केली. यामध्ये नोटाबंदीच्या वेळी रद्द करण्यात आलेल्या 500 च्या नोटांचाही समावेश असल्याची माहिती आहे. तसेच याआधीही सिंघल यांच्या निकटवर्तीयांवर छापेमारी करून करोडोंच्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.
वर्ष 2000 सालच्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांची खुंटी आणि चतरा येथील मनरेगा घोटाळ्याची चौकशी सरू आहे. मनरेगा घोटाळ्याप्रकरणी ईडीने यापूर्वी कनिष्ठ अभियंता रामविनोद सिन्हा यांच्यावर कारवाई केली होती. रामविनोद यांच्या चौकशीत समोर आलेल्या तथ्यांच्या आधारे ईडीने पूजा सिंघल यांच्या भूमिकेचा तपास सुरू केला होता. मनरेगा घोटाळा तसेच विविध पदे भूषवून नफा कमावून मनी लॉंड्रिंग या बाबींचा तपास सुरू आहे.
दरम्यान, पूजा सिंघल यांना 11 मे 2022 रोजी अंमलबजावणी संचालनालयाने मनरेगा योजनेतील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती. यानंतर फेब्रुवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने पूजा सिंघलला दोन महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला होता.