Pooja Khedkar | वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. तिचे वडील दिलीप खेडकर वर्ग एकचे अधिकारी असूनही पूजा खेडकर हिने नॉन क्रीमिलेअर गटातून यूपीएससी परीक्षेत आयएएस हे पद मिळविले होते. पूजा खेडेकर हिला नॅान क्रीमिलेअर कसे देण्यात आले असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. खोट्या कागदपत्रांवरून यूपीएसीनेदेखील तिचे आयएएस पद रद्द केले होते.
आता पूजा खेडकर हिच्या पालकांच्या नावावर तब्बल २ कोटी रुपयांच्या १२ मालमत्ता असल्याचे आढळून आल्याने तिचा पाय आणखी खोलात जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी सर्वेाच्च न्यायालयात आज १८ मार्च रोजी होणार आहे. यामुळे पूजा खेडकरने जामिनाबाबत दाखल केलेल्या याचिकेचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तब्बल २ कोटींची मालमत्ता
पुण्यातील नोंदणी महानिरीक्षकांना पत्र लिहून पूजा यांच्या आई वडिलांच्या मालमत्तांची माहिती मागितली होती. त्यानुसार मनोरमा खेडकर यांच्या नावे ५ लाख ६० हजार, ४२ लाख २५ हजार, १ लाख ५ हजार अशा तीन मालमत्तांची नोंद असल्याचे समोर आले आहे. या तीनपैकी एका मालमत्तेचे बाजारमूल्य १४ लाख ६५ हजार असताना खरेदीखतामध्ये केवळ १ लाख ५ हजारांचाच उल्लेख करण्यात आला आहे.
या तिन्ही मालमत्तांचे एकत्रित मूल्य ४८ लाख ९० हजार रुपये इतके आहे. तर दिलीप खेडकर यांच्या नावे एकूण नऊ मालमत्ता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार एकूण मालमत्तेचे मूल्य तब्बल १ कोटी ५६ लाख ९७ हजार ५०० रुपये होते. दोन कोटी रुपयांची मालमत्ता असताना सुद्धा खेडकर हिला नॉन क्रीमिलेअर कसे देण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.