नवी दिल्ली : निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावेळी त्यांनी यूपीएससीने त्यांची उमेदवारी रद्द केल्याच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत ज्या संघटनांच्या वतीने पूजा खेडकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे, त्यांना या याचिकेत पक्षकार करण्यात आले आहे. या याचिकेत पूजा खेडकर यांनी यूपीएससी, डीओपीटी, पुण्याचे जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना पक्षकार बनवले आहे.
पूजा खेडकर हिची विविध प्रकरणे उघड झाली होती. पूजा खेडकर हिचे अपंग प्रमाणपत्र, वडील निवृत्त आयएएस असताना घेतलेले क्रिमिलेअर प्रमाणपत्र यावरुन वादळ उठले. पूजा खेडकर विरोधात दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर यूपीएससीने चौकशी करुन तिने फसवणूक केल्याचे स्पष्ट होत असल्याचे म्हटले. यामुळे तिची उमेदवारी रद्द केली. आता पूजा खेडकर उच्च न्यायालयात पोहचली आहे. तिने याचिका दाखल केल्यामुळे न्यायालय काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, दिल्लीतील न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकर दुबईला गेल्याची बातमी काही माध्यमांनी दिली होती. परंतु दिल्ली पोलिसांनी ती भारताच असल्याचे म्हटले. दिल्ली पोलिसांनी तिच्यासंदर्भात महाराष्ट्र सरकार, एम्स आणि मसुरी सेंटरकडून माहिती मागितली आहे. आता तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे पूजा खेडकर देश सोडून गेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.