पुणे : मागच्या महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर UPSC कडून मोठी कारवाई करण्यात आली. यामुळे पूजा खेडकरला मोठा धक्का बसला आहे. UPSC कडून पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाील गैरवर्तन व त्यानंतर कागदपत्रांमध्ये आढळलेली कथित अनियमितता या पार्श्वभूमी या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे. एवढेच नाहीतर यापुढे यूपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये पूजा खेडकर यांना बसता येणार नाही, असंही यूपीएससीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गैरवर्तन केल्यामुळे पूजा खेडकर मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्या. यानंतर त्यांच्यावर सनदी सेवेत निवड होताना त्यांच्या दिव्यंगत्वाबाबत चुकीची कागदपत्रे सादर केल्याचाही आरोप करण्यात आला. शिवाय, त्यांच्या वडिलांची कोट्यवधींची मालमत्ता असूनही त्यांनी ओबीसी क्रिमी लेअर सुविधेचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, यासाठी त्यांनी परीक्षेसाठी अर्ज करताना नावामध्येही वारंवार बदल केल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यानंतर आता UPSC कडून ही मोठी कारवाई करण्यात आली.
नव्या अध्यक्षांनी पदभार घेण्यापूर्वीच केली कारवाई
पूजा खेडकर प्रकरण चर्चेत आल्यानंतर यूपीएससीच्या नेतृत्वामध्ये बदल करण्यात आले होते. त्यानुसार 1983 च्या बॅचच्या कर्नाटक काडरच्या सनदी अधिकारी प्रीती सुदान यांची UPSC च्या चेअरपर्सन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी प्रीती सुदान पदभार स्वीकारणार आहेत. मात्र त्यागओदरच UPSC कडून पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. UPSC च्या चेअरपर्सन होणाऱ्या सुदान या दुसऱ्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. याआधी 1996 साली आर. एम. बॅथ्यू यांनी UPSC चे अध्यक्षपद सांभाळले होते.