वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकरवर युपीएससीकडून मोठी कारवाई करण्यात आल्यानंतर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत पूजा खेडकर यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. केंद्र सरकारने सेवेतून बडतर्फ केल्याने पूजा खेडकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.केंद्र सरकारने प्रशासकीय सेवा प्रोबेशन नियम,१९५४ च्या १२ व्या नियमानुसार पूजा खेडकरवर ही कारवाई केली आहे.
बनावट कागदपत्र सादर केल्या प्रकरणी पूजा खेडकर चांगल्याच अडचणीत सापडल्या होत्या. अखेरीस केंद्र सरकारने कारवाई केली आहे. तीन दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयात आणखी एक रिपोर्ट दाखल केला होता. यात पूजा खेडकरच्या दिव्यांग असल्याची प्रमाणपत्रे खोटी असल्याचं स्पष्ट केलं होतं. पूजा खेडकरने सिव्हिल सेवा परीक्षा २०२२ आणि २०२३ च्या परीक्षेत दोन दिव्यांग प्रमाणपत्र सादर केली होती. मेडिकल अथॉरिटी अहमदनगर महाराष्ट्र यांनी ती जारी केली होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पूजा ही 2023 बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी असल्याचं सांगितलं गेलं. जून 2024 महिन्यात त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हा देण्यात आला होता. परंतु नियुक्तीपासूनच त्यांनी अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्या होत्या, त्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत. त्यांचे आजोबा (आईचे वडील) जगन्नाथराव बुधवंत हे आयएएस अधिकारी होते. तर, वडील दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत. सेवानिवृत्त झाल्यावर वंचितच्या पाठिंब्यावर ते अहमदनगर दक्षिणमधून यंदाची लोकसभा निवडणूक लढवली होती. तर, आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.
कोणत्याही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याला दोन वर्षांचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो. या काळात संबंधित अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये काम करावे लागते. त्यानंतर कामाचा अनुभव आल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते. याप्रमाणेच IAS असलेल्या डॉ. पुजा दिलीप खेडकर यांना 3 जून 2024 पासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात परिवाक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आलं होतं. मात्र, पूजा खेडकर हिने खासगी ऑडी कारवर अंबर दिवा लावला आणि महाराष्ट्र सरकारचं चिन्ह लावलं होतं. त्यांच्या कारनाम्याचे फोटो व्हायरल झाले होते.
यानंतर स्वत:ला गरीब आणि दृष्टीदोष असल्याचं सांगणाऱ्या अधिकारी इतक्या महागड्या ऑडी कारमधून कशा फिरतात असा प्रश्न उपस्थितीत झाला होता. यानंतर हा वाद वाढत गेल्याने पूजा खेडकर यांची वाशिमला बदली करण्यात आली. आता या प्रकरणात मोठे खुलासे झाल्याने केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलत पूजा खेडकर यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.