मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या राजकारणात चांगलेच चर्चेत आले आहे. विदर्भातील शिवसेनेचे मोठे नेते संजय राठोड यांचे नाव या प्रकरणात समोर आल्यापासून भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. यावर भाजप नेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांना सुनावलं आहे. भाजपचे प्रदेशाध्य़क्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्या अन्यथा विधानसभेचे कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा दिला आहे.
भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी देखील आक्रमक भूमिका घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. या पार्श्वभूमीवर राठोड यांचा राजीनामा घेण्यासाठीच्या हालचालींना वेग आल्याचे समजते. संजय राठोड यांना राजीनामा देण्याच्या सूचना करण्यात आल्याचे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे. मात्र या संदर्भात राठोड यांच्याकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
मागील अनेक दिवसांपासून वनमंत्री संजय राठोड यांचे अनेक फोटो समोर येत आहे. त्यातच व्हायरल झालेल्या 12 ऑडिओंमुळे हे प्रकरण अधिक क्लिष्ट झालं आहे. पुरावे असतानाही संजय राठोड यांच्यावर कारवाई का केली जात नाही, असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे. आता पुढील २४ तासांत राठोड यांचा राजीनामा येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.