इस्लामाबाद – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी सोमवारी उशिरा तालिबानच्या प्रमुख समन्वयक नेत्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली, अशी माहिती तालिबानच्या प्रवक्त्याच्यावतीने देण्यात आली. अफगाणिस्तानात तैनात असलेल्या अमेरिका आणि नाटो सैनिकांची हत्या करण्यासाठी रशियाकडून तालिबानला पैसे दिले जात असल्याचे गोपनीय वृत्त पुढे आले आहे. या वृत्ताची दखल अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली आहे.
त्या पार्श्वभुमीवर पॉम्पेओ यांनी तालिबानी नेत्याबरोबर चर्चा केली आहे. मात्र आजच्या बैठकीदरम्यान काही तालिबानी नेत्यांना रशियाकडून पैसे मिळाल्याच्या कथित आरोपाचा उल्लेख करण्यात आला नाही.
मुल्ला अब्दुल गनी बरादारबरोबरच्या या चर्चेत पॉम्पेओ यांनी अफगाणिस्तानातील हिंसाचार कमी करण्यावर भर दिला. तसेच अमेरिका आणि तालिबानमध्ये फेब्रुवारी महिन्यात झालेल्या करारानुसार शांतता प्रक्रिया राबवण्याच्या विविध उपाय योजनांबाबतही त्यांनी चर्चा केली, असे ट्विट तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीन याने केले आहे.
तालिबान आणि अमेरिकेतील शांतता कराराचा आढावा घेण्यासाठी या विषयाचे समन्वयक झालमाय खलिलझाद सध्या दौऱ्यावर आहेत. आज ते उझबेकिस्तानमध्ये होते. उद्या ते पाकिस्तानचा दौरा करणार आहेत. याशिवाय दोहा, कतार येथेही ते जाणार होते, तिथे तालिबान्यांनी राजकीय कार्यालय थाटले आहे.