-->

इराणचे अल कायदाशी छुपे संबंध – पॉम्पेओ यांचा आरोप

वॉशिंग्टन – इराणने अल कायदा नेटवर्कबरोबर छुपे संबंध निर्माण केले आहेत, असा आरोप अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ यांनी केले आहेत. इराणच्या काही वरिष्ठ नेत्यांवर नव्याने निर्बंध लागू केल्याची घोषणाही पॉम्पेओ यांनी केली. ट्रम्प प्रशासन सत्तेवरून पायउतार होण्यासाठी जेमतेम आठवड्याभराचा कालावधी शिल्लक राहिला असताना पॉम्पेओ यांनी हे नवे आरोप केले आहेत. 

इराकमध्ये ऑगस्ट 2020 मध्ये अल-कायदाचा प्रमुख अबू मुहम्मद अल-मसरी याला इस्त्राईलने घडवलेल्या हल्ल्यामध्ये मारण्यात आले होते, असा दावा न्यूयॉर्कमधील एका आघाडीच्या दैनिकाने केला होता. त्या वृत्ताच्या आधारे पॉम्पेओ यांनी हा आरोप केला आहे. 

इराणने जगभरातील आघाडीच्या देशांबरोबर 2015 मध्ये केलेल्या आण्विक करारातून ट्रम्प यांनी 2018 साली माघार घेतली होती. मात्र नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी या करारामध्ये अमेरिकेला पुन्हा सहभागी करण्याबाबत वाटाघाटी करण्याचे सूतोवाच केले आहे.

इराणचे अल कायदाबरोबर छुपे संबंध असल्याची गोपनीय सूत्रांची माहिती आहे. शिया बहुल इराण आणि सुन्नी प्राबल्य असलेल्या अल कायदामध्ये सहमती होणे इस्लामिक विश्‍वामध्ये अनैसर्गिक आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने 1996 मध्ये ओसमा बिन लादेनला आश्रय दिल्यापासून इराण आणि अल कायदामध्ये विरोधी भूमिका होती. दोन वर्षांनंतर तालिबानने उत्तरेकडील मजार-ए-शरीफ येथे अनेक मुत्सद्दी लोकांचा खून केला असा आरोप इराणने केला होता, असे पॉम्पेओ म्हणाले. 

अल-मसरी अणि त्याची कन्या, ओसामा बिन लादेनचा मुलगा हमझा याची विधवा पत्नी हे मारले गेल्याच्या वृत्ताला अमेरिकेने यापूर्वीच दुजोरा दिला होता. मात्र त्यासंदर्भात पॉम्पेओ यांनी प्रथमच अधिकृत वक्‍तव्य केले आहे.

11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी इराणने अल कायदाच्या सदस्यांवर बारकाईने नजर ठेवली होती. 2015 नंतर ओबामा प्रशासनाकडून फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी आदी देशांबरोबर मिळून इराणबरोबरच्या कराराला अंतिम रुप दिले जात होते, तेंव्हा इराण आणि अल कायद्यादरम्यानचे हे संबंध अधिक जवळचे झाले. असा आरोपही त्यांनी केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.