पुणे – कवडीपाट येथे परदेशी पक्ष्यांचे आगमन झाल्याने पर्यटक तसेच पक्षी अभ्यासकांची पावले तिकडे वळत असली तरी, या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या बंधाऱ्याला मात्र, कचऱ्याचा विळखा पडला आहे. पुणे महापालिका आणि स्वच्छ पुणे-स्वच्छ भारत या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली. त्यावेळी तब्बल दोन कंटेनर काचा आणि थर्माकॉल आणि प्लॅस्टिक महापालिकेकडून काढण्यात आले. महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या मुठाई-मुळाई महोत्सवांतर्गत ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
कवडीपाट येथे हिवाळ्यात लाखोंच्या संख्येने स्थलांतरित पक्षी येतात. या ठिकाणी असलेल्या पक्षी अभयारण्यात पक्षीप्रेमी तसेच पक्षी अभ्यासक आणि छायाचित्रकारांसाठी हे पक्षी संमेलन अभूतपूर्व संधी ठरते. मात्र, गेल्या काही वर्षांत या ठिकाणी असलेल्या जलसाठ्याला प्रदूषणाचा विळखा पडत आहे.
पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीतून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक, थर्माकॉलचा कचरा या ठिकाणी असलेल्या बंधाऱ्यांच्या परिसरात साचतो. परिणामी पक्ष्यांचा हा नैसर्गिंक अधिवास अडचणीत आला आहे. त्यामुळे महापालिकेने आपल्या जबाबदारीचे भान राखत रविवारी कवडीपाट येथे स्वच्छता मोहीम राबविली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात थर्माकॉल, काचा, तसेच प्लॅस्टिकसह बंधाऱ्याला अडकलेला कचरा संकलीत केल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी दिली. त्यासाठी आवश्यक असलेले कर्मचारी तसेच यंत्रणा हडपसर क्षेत्रीय कार्यालयाकडून देण्यात आली होती.