नवी दिल्ली (वंदना बर्वे) – जगातील सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये देशाची राजधानी दिल्लीचा समावेश असल्याचे मत स्वित्झर्लंड हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आले आहे. यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक आठवड्याच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे.
दिल्लीच्या सीमेवरील शेतांमध्ये जळणारी पहाटी आणि दिवाळीतील फटाक्यांमुळे राजधानीतील प्रदुषण अत्यंत धोकादायक बिंदूवर पोहचले आहे. हवा विषारी झाली आहे. यामुळे मुख्यमंत्री अरविंज केजरीवाल यांनी दिल्लीत सात दिवसाच्या लॉकडाउनची घोषणा केली आहे.
मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन, पर्यावरण मंत्री गोपाल राय आणि मुख्य सचिव उपस्थित होते.
दिल्लीतील शाळा सोमवारपासून शनिवारपर्यंत बंद राहणार आहे. मात्र, आॅनलाइन क्लास सुरू राहील. 14 ते 17 नोव्हेंबरपर्यंत बांधकाम बंद राहील आणि सरकारी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने अलिकडेच एका याचिकेवर सुनावणी करताना दिल्लीतील प्रदुषण थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले होते. प्रदुषण थांबविण्यासाठी काय करता येईल? यावर सरकार विचार करीत असल्याची माहिती केजरीवाल यांनी यावेळी दिली.
आज शनिवारी दिल्लीच्या हवेतील प्रदुषणाच्या पातळीने 500 एक्यूआईची पातळी ओलांडली. ही खूप धोकादायक पातळी आहे. स्वित्झर्लंड हवामान खात्यानुसार दिल्लीव्यतिरिक्त मुंबई आणि कोलकाता सुध्दा प्रदुषणाच्या विळख्यात आहे.