पुण्यातील मतदारांना वोटर स्लीप न मिळाल्याने मतदान घटले?

पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघात यंदा 4.27 टक्‍क्‍यांनी मतदान घटले आहे. मतदानाची टक्केवारी कमी होण्यामागे मतदारांना फोटो वोटर स्लीपचे वाटप वेळेत न मिळणे हेदेखील एक कारण आहे. वोटर स्लीप न मिळाल्याने मतदान केंद्र कुठे आहे, मतदार यादीत नाव आहे का, याची माहिती मतदारांपर्यंत पोहचली नाही. त्यामुळे मतदानाची टक्केवारी घटली असल्याचे समोर आले आहे.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे वोटर स्लीप देण्याची जबाबदारी देण्यात आली होती. मतदारांना घरोघरी जाऊन स्लीप वाटण्याचे काम बीएलओ यांच्याकडे देण्यात आले होते. शहरात सुमारे दोन हजार मतदान केंद्र आहेत. त्यानुसार दोन हजार बीएलओ आहे. शहरात मतदारांची संख्या सुमारे 20 लाख मतदार आहेत. बीएलओची संख्या कमी असल्याने तसेच कमी वेळेत मतदारांपर्यंत या कर्मचाऱ्यांना पोहचता आले नाही. त्याचप्रमाणे जिल्हास्तरावरून वोटर स्लीप किती वाटप झाले, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली नव्हती. त्यामुळे स्लीप वाटपाचे काम काही बीएलओंनी गांभीर्याने घेतले नाही. शहरात अनेक भागातील नागरिकांना वोटर स्लीपा मिळाल्याच नाहीत. त्यामुळे आपले नाव मतदार यादीत आहे का, मतदान केंद्र कुठे आहे, याची माहिती मतदारांना मिळाली नाही. जर अधिकाधिक मतदारांपर्यंत वोटर स्लीप पोहचल्या असत्या, तर मतदानाची टक्केवारी वाढली असती, असे बोलले जात आहे.

शहरी भागात या स्लीप वेळेत मतदारांपर्यंत पोहचविणे हे आव्हान बीएलओ यांच्यासमोर होते. एका बीएलओ यांना सुमारे 1 हजार ते दीड हजार मतदारांना वोटर स्लीप द्यावयाच्या होत्या. वोटर स्लीप वाटप करताना एकाच भागातील सलग घरक्रमांकानुसार या स्लीप देण्यात आलेल्या नाहीत. एकाच वार्डातील परंतु वेगवेगळ्या घरक्रमांकाची सरमिसळ आहे.

त्यामुळे प्रथम एक सारख्या क्रमांकानुसार एका भागातील घरक्रमाकांनुसार या ओळखपत्र लावून घेण्याचे काम पहिल्यांदा करावे लागत असल्याचे बीएलओ यांचे म्हणणे आहे. तसेच पत्ते शोधावे लागत असल्याने शहरी भागात थोडासा वेळ लागत होता. अंतिम मतदार यादी आणि पुरवणी मतदारयादीनुसार स्लीप तयार करण्यात आल्याने एकाच घरात दोनवेळा या स्लीप वाटण्यासाठी जावे लागत असल्याचे बीएलओंनी सांगितले. जिल्हा प्रशासनाकडून 75 टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र 49 टक्केच मतदान झाले. जिल्हा प्रशासनाकडून 75 टक्‍क्‍यांपर्यंत जरी व्होटर स्लीपचे वाटप झाले असते, तर मतदानाची आकडेवारी वाढण्यास मदत झाली असती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.