कसब्यातच मतदान घटले; बालेकिल्ल्यातच बापटांना धक्का

यावर्षी 51 टक्के मतदान


 2014 मध्ये 58 टक्के झाले होते मतदान

पुणे – महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यातच मतदानाची टक्केवारी घटल्याचे दिसून आले आहे. मागील वर्षीपेक्षा 7 टक्‍क्‍यांनी ती घटली आहे.

कसबा मतदार संघातून विक्रमी मताधिक्‍याने बापट हे चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्याच मतदार संघातून जास्तीत जास्त मतदान होणे अपेक्षित आहे. या मतदार संघात बहुतांशी पेठा येतात. येथील बहुतांश मतदार हा भाजप बहुल आहे. असे असतानाही मतदारांनी बाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्याने ही टक्केवारी कमी झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. मात्र या सगळ्या पार्श्‍वभूमीवर कार्यकर्त्यांनी मतदारांना घराबाहेर काढणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही. यामुळे ही टक्केवारी घटल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मतदानाची टक्केवारी घटली असली, तरी कसबा मतदार संघात शांततेत मतदान पार पडले. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरूवात झाली. नऊ वाजेपर्यंत 8.53 टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदारांची गर्दी वाढली. 11 वाजेपर्यंत 12.23 टक्के मतदान झाले. त्यानंतर मात्र कुटुंबांसह मतदानाला येणाऱ्यांची संख्या वाढली आणि एक वाजेपर्यंत 25.06 टक्के मतदान झाले.

दुपारी ऊन असतानाही काही मतदार बाहेर पडले आणि तीन वाजेपर्यंत 32.43 टक्‍के मतदान झाले. त्यानंतर सहा वाजेपर्यंत 43.44 टक्के मतदान झाले. सात वाजेपर्यंत ही आकडेवारी 50 ते 51 टक्‍क्‍यांपर्यंत गेली.

सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये याठिकाणी 58 टक्के मतदान झाले होते. एवढेच नव्हे तर कसब्यातून सर्वाधिक मतदान झाले होते. मात्र यावर्षी ते सात टक्‍क्‍यानेच घसरले आहे. अन्य विधानसभा मतदार संघातील टक्का घसरला आहे. परंतु थेट बापटांच्याच घरच्या मतदार संघातच टक्केवारी घसरल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे. ही टक्केवारी घसरण्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न आता करावा लागणार असून, याचा फटका विधानसभेलाही बसू शकतो, याची जाणीव आता येथील उमेदवाराला ठेवावी लागणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.