9 समित्या यापूर्वीच बिनविरोध
पुणे – महापालिकेच्या 15 प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी मतदान होणार आहे. या समित्यांमधील 9 समित्यांच्या अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध झाली असून उर्वरीत सहा समित्यांसाठी मतदान होणार आहे.
बिनविरोध झालेल्या 9 प्रभाग समित्यांमध्ये भाजपचे आठ आणि राष्ट्रवादीला एक अध्यक्षपद मिळाले. तर एका प्रभाग समितीत सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांची संख्या समान असल्याने चिठ्ठी काढून निवड केली जाणार आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजपने समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नगरसेवकांना “व्हीप’ बजावला आहे. तर, भाजपकडून एकाही प्रभाग समिती अध्यक्षपद देण्यात आले नसले तरी शिवसेना भाजप उमेदवारालाच मतदान करणार असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या प्रभाग समित्यांसाठी होणार मतदान
नगर रोड- वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय,धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय,भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय
ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय कोणाच्या हाती?
ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय प्रभाग समितीमध्ये एकूण आठ नगरसेवक आहेत. त्यात भाजपचे चार, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे चार नगरसेवक आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाचे नगरसेवकांची संख्या सारखी आहे. त्यामुळे चिठ्ठी टाकून अध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदीप गायकवाड आणि भाजपच्या मंगला मंत्री यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार हे चिठ्ठीकाढून निश्चित केले जाणार आहे. सकाळी 11 पासून या निवडणुका महापालिकेच्या मुख्य सभागृहात होणार आहेत.