सातारा लोकसभेसाठी पहिल्या दोन मतदारांचे मतदान

भुईंजचे आयएफएस अधिकारी राजेश स्वामी यांचे शुक्रवारीच केनियातून सपत्निक मतदान 

कवठे – सातारा लोकसभा मतदार संघासाठी 12 दिवस आधीच मतदान करून आयएफएस अधिकारी तथा केनियातील भारताचे उपउच्चायुक्त राजेश स्वामी व त्यांच्या पत्नी सौ. संजीवनी स्वामी हे दोघे या मतदारसंघात मतदान करणारे पहिले मतदार ठरले आहेत. सातारा लोकसभा मतदार संघासाठी दि. 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. परदेशातील भारतीय दूतावासात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना पोस्टल मतदान करण्याची सुविधा असते. त्या करता प्रत्येक दूतावसात एका मतदान अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली असते. मात्र परदेशस्थित अधिकाऱ्यांना त्यासाठी आधी ऑनलाईन नोंदणी करावी लागते. त्याप्रमाणे मूळ भुईंज येथील स्वामी यांनी केनियात ती केली होती.

शुक्रवार दि. 12 रोजी त्यांना मतपत्रिका उबलब्ध करून देण्यात आल्या. त्यानुसार स्वामी दांपत्याने मतदान करून त्या मतपत्रिका सातारा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवल्या. परदेशात खासगी उद्योग, नोकरीनिमित्त स्थायिक असलेल्या व्यक्तींना अद्याप पोस्टल मतदानाचा अधिकार नाही. तो परदेशातील भारतीय दूतावसात कार्यरत असणाऱ्यांना आहे. त्यातही या अधिकाऱ्यांनी स्वतःहून आधी आपल्या मतदारसंघाचा उल्लेख करून नोंदणी करणे बंधनकारक आहे. स्वामी मतदानाचे महत्त्व जाणतात आणि या जाणिवेतूनच त्यांनी केनियाची राजधानी नैरोबी येथून स्वतःहून नोंदणी करत सपत्नीक मतदान केले. त्यामुळे थेट परदेशातून 12 दिवस आधीच मतदान केलेले राजेश स्वामी व सौ. संजीवनी स्वामी या मतदारसंघात मतदान करणारे पहिले मतदार ठरले आहेत.

मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून ते अत्यंत डोळसपणे करणे आवश्‍यक आहे, त्यामुळे प्रत्येकाने जागरूकतेने व स्वतःच्या सद्‌सद्विवेकबुद्धीला स्मरून मतदान करावे, असे आवाहन स्वामी दांपत्याने केले आहे. दरम्यान राजेश स्वामी केनियात मतदान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी भुईंज येथे आले असून त्यांना दि. 19 रोजीच केनियाला परतायचे आहे. त्यामुळे त्यांना तेथून मतदान करावे लागले आणि त्यामुळेच स्वामी दांपत्य सातारा मतदारसंघात मतदान करणारे पहिले दोघे मतदार ठरलेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.