पुणे, बारामतीसाठी आज मतदान

41 लाख मतदार निवडणार खासदार


मतदानाची वेळ : सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत

पुणे – पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी (दि.23) मतदान होणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून 31, तर बारामती मतदारसंघातून 18 उमेदवार रिंगणात आहे. या उमेदवारांचे भवितव्य इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) बंद होणार आहे. मतदानासाठी पुणे आणि बारामती मतदारसंघात एकूण 4 हजार 369 मतदान केंद्र असून, दोन्ही मतदारसंघात एकूण 41 लाख 87 हजार 269 मतदार आहेत. मतदारांना सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजप-शिवसेना महायुतीतर्फे गिरीश बापट, तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीकडून मोहन जोशी हे रिंगणात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सुप्रिया सुळे, तर भाजपकडून कांचन कुल हे निवडणूक लढवित आहे.

पुरेशा संख्येने इव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक वोटिंग मशीन), व्हीव्हीपॅट (वोटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल) मतयंत्रांची उपलब्धता, निवडणूक कर्मचारी आणि पोलीस बंदोबस्ताचे नियोजन, संवेदनशील केंद्रांवर वेबकास्टिंग, टपाली मतदानाची सोय, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा आणि भरारी पथकांची नियुक्ती, अशी चोख तयारी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे.

पुणे मतदारसंघात 91, तर बारामती मतदारसंघात 62 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. याठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे. मतदानासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना अंतिम प्रशिक्षण सोमवारी सकाळी देण्यात आले. त्यानंतर दुपारनंतर सर्व कर्मचारी नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर पोहोचले. मतदान करणे सुलभ व्हावे, यासाठी मतदान केंद्रावर आवश्‍यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, असे प्रशासनाने सांगितले.

पुणे लोकसभा मतदारसंघ
* एकूण मतदार – 20 लाख 74 हजार 861
* एकूण मतदान केंद्र – 1997
* संवेदनशील मतदान केंद्र -91
* भरारी पथके – 26

बारामती लोकसभा मतदारसंघ
* एकूण मतदार – 21 लाख 12 हजार 408
* एकूण मतदान केंद्र – 2372
* संवेदनशील मतदान केंद्र – 62
* भरारी पथके – 34

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.