अन्टिग्वा – वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 सामन्यात श्रीलंकेच्या अकिला धनंजयाने हॅट्ट्रिक घेतली. मात्र, त्याच्याच नंतरच्या षटकात वेस्ट इंडिजच्या कॅरन पोलार्डने सलग सहा चेंडूंवर सहा षटकार फटकावत संघाला 4 गडी राखून विजय मिळवून दिला. श्रीलंकेविरुद्ध सुरू झालेल्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यामध्ये वेस्ट इंडिजने चार गडी राखत सामना जिंकला.
पोलार्डने धनंजयाच्या एक षटकामध्ये सहा षटकार फटकावले. पोलार्डने युवराज सिंग, हर्षल गिब्जच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे. युवराज व गिब्ज या दोघांनाही एकाच षटकामध्ये सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे.
युवराजने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत तर, गिब्जने एकदिवसीय सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. पोलार्डने विंडीजची फलंदाजी सुरू असतानाच पाचव्या षटकामध्येच हा पराक्रम करताना एकूण 11 चेंडूमध्ये 38 धावांची खेळी केली. यामध्ये सहा चेंडूत सहा षटकांरांचा समावेश होता.
त्यापूर्वी याच सामन्यात विंडीजची फलंदाजी सुरू असताना श्रीलंकेचा अकिला धनंजयाने हॅट्ट्रिक साकार केली. त्याने डावातील चौथे षटक टाकताना इव्हान लेविस, ख्रिस गेल व निकोलस पूरन यांना सलग तीन चेंडूंवर बाद केले. मात्र, पोलार्डच्या वादळी फलंदाजीमुळे धनंजयाची कामगिरी दुर्लक्षितच राहिली. या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी होणार आहे.