विधानसभा निवडणूक : पिंपरीसाठी एकूण 479 ईव्हीएम
पिंपरी – पिंपरी विधानसभा निवडणूक मतदानासाठी 399 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) सज्ज झाली आहेत. राखीव 80 मतदान यंत्रांचे काम दोन दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे. निवडणुकीसाठी एकूण 479 मतदान यंत्रांच्या (ईव्हीएम) कामाला सोमवारपासून (दि. 14) सुरुवात झाली.
प्राधिकरणातील डॉ. हेडगेवार भवनाशेजारील बॅडमिंटन हॉल येथे हे काम केले जात आहे. पिंपरी विधानसभेसाठी 18 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पिंपरी विधानसभेतंर्गत 399 मतदान केंद्र असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी असणाऱ्या ईव्हीएममध्ये 2 बॅलेट युनिट, 1 कंट्रोल युनिट असणार आहे. त्याशिवाय, प्रत्येक मतदान केंद्रनिहाय 1 व्हीव्हीपॅट मशीन लागणार आहे. मतदान केंद्रांसाठी एकूण 20 टक्के राखीव ईव्हीएम मशीन पकडून एकूण 479 ईव्हीएम मशीन आहेत. 2 बॅलेट युनिट, 1 कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट याची जोडणी करुन या मशीन मतदानासाठी तयार करण्यात येत आहे.
मशीन तयार झाल्यानंतर संबंधित मशीन 20 तारखेला मतदान केंद्रांवर दुपारी 12:30 वाजेपर्यंत पोहचेल असे नियोजन करण्यात आले आहे. मतदान यंत्र साहित्य वाटप, मशीन वाटप आणि मशीन सील करणे, आदी कामांसाठी एकूण 200 कर्मचारी नियुक्त केले आहेत. प्रत्येक ईव्हीएम मशीन मतदानासाठी तयार करण्याचे काम पूर्ण करताना मतदान केंद्राचे नाव, क्रमांक लिहिणे अशी बरीच प्रक्रिया करावी लागत आहे.
साहित्य पोहचविण्यासाठी 80 बस –
मतदान केंद्रांवर मतदानाचे साहित्य पोहचविण्यासाठी “पीएमपीएमएल’च्या 80 बसची व्यवस्था केली जाणार आहे. मतदान केंद्रांवर 20 तारखेला सकाळी 9 ते 11 या वेळेत निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी तिसरे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच निवडणूक साहित्य वाटपाला सुरुवात होईल. दुपारी 12:30 वाजेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्षासह पाच कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. तसेच, 10 टक्के राखीव कर्मचारी असणार आहेत.