तीन वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या विद्युत खांबाचा दोन दिवसांपूर्वी पडला “उजेड’
पुणे – विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे पाडकाम सुरू आहे. त्यात महापालिकेने चक्क लाखो रुपये किंमतीचा डेकोरेटिव्ह विद्युत पोल तेथे बसवला आहे. विशेष म्हणजे, याची खांबाची निविदा तीन वर्षांपूर्वी काढली गेली होती. त्याचे पैसेही दिले होते. मात्र, तो पोल दोन दिवसांपूर्वी येथे बसवला असून, काही तरी गोलमाल असल्याचा “लख्ख उजेड’ पडला आहे.
‘पीएमआरडीए’ने हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी अडथळा ठरणारा विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडण्याचे काम सुरू आहे. हे काम निम्मे झाले आहे. पाषाणसह, बाणेर, औंध आणि शिवाजीनगरकडील चारही रॅम्प काढण्यात आले आहेत. पाषाणकडे उतरणारा उड्डाणपूल संपूर्ण पाडण्यात आला आहे. बाणेर आणि पाषाणकडे उतरणारे रॅम्प जरी काढण्यात आले, असले तरी तेथील उड्डाणपुलाचा भाग मात्र पाडणे बाकी आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या चौकात नवीन दुमजली उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. असे असताना महापालिकेच्या विद्युत विभागाने डेकोरेटिव्ह विद्युत पोल लावण्याचा उतावीळपणा दाखवला आहे.
पाषाण आणि बाणेरकडे जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांच्या मध्ये आणि चौकाच्या पश्चिमेला दोन दिवसांपूर्वी लाखो रुपये किंमत असलेला विद्युतपोल उभारला आहे. या पोलच्या दोन्ही बाजूला पाडण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे अंतर किमान 10 मीटर असेल. त्यामुळे पूल पाडताना हा पोल अडचणीचा ठरणार आहे हे निश्चित.
दोषींवर कारवाई करावी
सद्यस्थितीत विद्यापीठ चौकात कोणतीही सुशोभिकरणाची कामे करणे अपेक्षित नाही. असे असताना या चौकात लाखो रुपये खर्च करून डेकोरेटिव्ह विद्युतपोल बसवण्यात आला. महापालिकेचे घटलेले उत्पन्न बघता अशी कामे करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे पुणेकरांचे पैसे पाण्यात घालायचे उद्योग करणाऱ्यांची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचने केली आहे.
या पोलची निविदा तीन वर्षांपूर्वीच काढण्यात आली होती. ठेकेदारांना संपूर्ण बिलही त्यावेळी अदा करण्यात आले आहे. मात्र, पोल उभारण्यासाठी जागा उपलब्ध होत नव्हती. ती दोन दिवसांपूर्वी उपलब्ध झाल्याने तेथे तो पोल उभारण्यात आला आहे. मात्र, त्याचे नुकसान होत असेल तर तो काढून टाकण्यात येईल.
– श्रीनिवास कंदूल, विद्युत विभाग प्रमुख, मनपा