महापालिकेतील मारहाणीवरून राजकारण शिगेला

महापालिका लुटीला आळा घातल्यामुळे कलाटे बंधूंची आगपाखड – नामदेव ढाके

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या कार्यालयात सोमवारी माजी सभापती विलास मडेगिरी यांना मारहाण झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक मयूर कलाटे, शिवसेनेचे नगरसेवक राहुल कलाटे व स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडेगिरी यांच्यात झालेल्या हाणामारीत विलास मडेगिरी जखमी झाले. आता यावरुन पिंपरी चिंचवड महापालिकेत राजकारण शिगेला पोहचले आहे. महापालिका लुटीला आळा घातल्यामुळेच दोन्ही कलाटे बंधूंची आगपाखड सुरु आहे. त्यातून ते अशाप्रकारे गुंडगिरी करत असल्याचा आरोप सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी पत्रकार परिषदेत केला.

नामदेव ढाके म्हणाले, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांकडून महापालिकेत एक वेगळेच राजकारण सुरु आहे. नागरिकांच्या कामाऐवजी वैयक्तिक स्वार्थासाठी मारहाण करण्याचा प्रकार सुरु आहे. राहुल कलाटे व मयूर कलाटे नेहमीच अशाप्रकारे दादागिरी करत असतात. सोमवारी त्यांनी स्थायी समितीचे सभापती विलास मडेगिरी यांना महापालिकेत बेदम मारहाण केली. त्यामुळे संपूर्ण शहरात त्यांची वाईट चर्चा सुरु आहे. ही दादागिरी लपविण्यासाठी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर खासगी वाटाघाटीने भूसंपादन करण्याचा विषय मंजूर केला जात नसल्याचे कारण दोघांनीही पुढे केले आहे. मात्र महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मंजूर केले जातात. त्यामध्ये एकटे विलास मडेगिरी नसतात. त्यामुळे मडेगिरी यांनी प्रस्ताव मंजूर करून घेतला नाही असे म्हणणे हास्यापद आहे. हा प्रस्ताव महासभेत तहकूब ठेवण्यात आला आहे. तो पुन्हा मंजुरीसाठी येणार आहे.

दुसरी बाब म्हणजे खासगी वाटाघाटीने भूसंपादन करण्याच्या नियमाचा आधार घेत काही जण महापालिकेला लुटत आहे. महापालिकेला शहरातील विविध आरक्षणे विकसित करावी लागतात. त्यासाठी खासगी जमिनी ताब्यात घ्याव्या लागतात. त्याचा मोबदला म्हणून मोठ्या प्रमाणात रक्कम अदा करावी लागते. हे लक्षात घेऊन काही जण एजंटामार्फत जमिनी कवडीमोल भावाने घेत आहेत. त्या जमिनीचे तुकडे करुन महापालिकेला कोट्यवधी रुपयांना दिली जात आहे. त्यामुळे खासगी जमिनी वाटाघाटीने घेताना रोख रक्कमेच्या मोबदल्याऐवजी महापालिकेने टीडीआर देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामागे शहरातील करदात्या नागरिकांच्या पैशांचा शहराच्या विकासासाठी विनियोग व्हावा हा हेतू आहे. मात्र राहुल कलाटे व मयूर कलाटे यांना हा प्रस्ताव आवडलेला नाही. त्यांच्या धंद्याला कायमचा आळा घालण्याचा निर्णय घेतल्याने राहुल कलाटे आगपाखड करत आहेत. त्यांनी एका ज्येष्ठ नगरसेवकाला केलेली मारहाण निंदनीय असल्याचे ढाके म्हणाले.

आम्ही कोणतीही दादागिरी करत नाही. दादागिरी मुळातच यांच्या पक्षामध्येआहे. गेल्या तीन वर्षापासून प्रत्येक गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु आहे. भूसंपादनाचा विषय यांनी अडवून धरला आहे. त्यामुळे गोरगरीब जनतेचे नुकसान होत आहे. वाकड येथील रस्त्याचे प्रकरण न्यायालयात आहे. न्यायालयात त्याचा निर्णय होईलच. मात्र गुंडगिरी दादागिरीचे मूळ वृक्षच भाजपमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी असे हास्यास्पद आरोप करू नये.
– मयूर कलाटे, नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेस


घडल्या प्रकाराला विधानसभेच्या निवडणुकीची झालर आहे. विलास मडेगिरी हे आमदार जगताप याचे निकटवर्तीय आहेत. मडेगिरी हे जगतापांचे प्रतिनिधी म्हणून अनेकवेळा समोर आले. मला विधानसभेच्या निवडणुकीवेळी मिळालेली लोकप्रियता, लाखभर मते यामुळे आमदार जगताप यांच्या राजकीय कारकीर्दीला धक्का लागला. याचा राग काढण्याची संधी म्हणून मडेगिरी यांना पुढे करून हा राजकीय स्टंट केला आहे. मडेगिरी हे ज्येष्ठ नगरसेवक आहे. त्यांचा आदर आहेच मात्र त्यांनी कोणाच्या हातचे बाहुले बनून राहू नये.
– राहुल कलाटे, नगरसेवक, शिवसेना.

Leave A Reply

Your email address will not be published.