राजकारण : नवी राजकीय समीकरणे

राहुल गोखले

ज्या पदासाठी नवज्योतसिंग सिद्धू यांनी एवढा अट्टहास केला त्या पदाने त्यांना वाकुल्याच दाखविल्या आहेत. यामागे कॉंग्रेस नेतृत्वाला अमरिंदर सिंग यांच्या संभाव्य रोषाची भीती वाटत असावी, हेही कारण असावे.

गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाने नवीन मुख्यमंत्री नियुक्‍त करताना जे धक्‍कातंत्र वापरले तेच पंजाबात कॉंग्रेसने वापरले. विजय रूपाणी यांची उचलबांगडी करून भाजपने पहिल्यांदाच आमदार बनलेले भूपेंद्र पटेल यांची त्या पदावर नियुक्‍ती केली.

वास्तविक मावळत्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री असणारे नितीन पटेल यांना मुख्यमंत्री केले जाईल अशी शक्‍यता व्यक्‍त होत होती. पण पटेल यांची संधी हुकली. पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेस त्या पदावर कोणाला नेमणार याविषयी तर्कवितर्कांना उधाण आले होते.

अर्थात, प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांचे नाव स्वाभाविक चर्चेत होते आणि अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळातील काही जण देखील स्पर्धेत होते. तथापि, कॉंग्रेसने अनपेक्षितरित्या चरणजितसिंग चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाची संधी दिली. गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल यांच्या नावाची चर्चा नव्हती आणि पंजाबात चन्नी मुख्यमंत्री होतील असा अंदाज कोणीही वर्तविला नव्हता. मात्र, कॉंग्रेस श्रेष्ठींनीही धक्‍कातंत्र वापरले आणि आता चन्नी मुख्यमंत्री झाले आहेत.

पंजाबात चार-पाच महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार आहे. तेव्हा मुख्यमंत्रिपद मिळाले असले तरी चन्नी यांच्यापाशी तयारीसाठी फारसा अवधी नाही. तरीही कॉंग्रेसने चन्नी यांची निवड केली आहे. तथापि एवढ्याने केवळ पंजाबात कॉंग्रेससमोरील आव्हाने संपली आहेत, असे म्हणता येणार नाही.

वास्तविक अमरिंदर सिंग यांच्यात पंजाबमध्ये कॉंग्रेसला विजय मिळवून देण्याची क्षमता होती. त्यातच शेतकरी आंदोलनामुळे भाजपवर नाराजी आहे आणि अकाली दलाला अलीकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फारसे यश मिळाले नव्हते. अकाली दल आणि बहुजन समाज पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी केली आहे खरे;

मात्र त्याने कॉंग्रेसच्या भवितव्यावर फारसा परिणाम होण्याचा संभव नव्हता. तेव्हा आगामी निवडणुकीत आपण पक्षाला विजयी करू शकू असा आत्मविश्‍वास अमरिंदर सिंग यांना होता. पण तसा विश्‍वास खुद्द त्यांच्या मंत्रिमंडळातील काही सदस्य आणि अनेक कॉंग्रेस आमदारांना नव्हता.

याचे कारण म्हणजे करोनाची परिस्थिती हाताळण्यात अमरिंदर सिंग यांना आलेले अपयश आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांना अमरिंदर सिंग यांना भेटण्यात येणाऱ्या अडचणी. पक्षांतर्गत संपर्क आणि पर्यायाने संवाद तुटला होता तद्वत मुख्यमंत्री म्हणून तो जनतेशी देखील तुटला होता आणि अमरिंदर सचिवांमार्फत कारभार हाकत आहेत, असा आरोप होत होता.
त्यातच नवज्योतसिंग सिद्धू यांनी अमरिंदर सिंग यांच्याविरोधात एकच रान उठविले होते आणि प्रदेशाध्यक्ष झाल्यावर देखील आपल्या बोलभांडपणास त्यांनी लगाम घातला नाही.

किंबहुना “मुख्यमंत्री हटाव’ हाच त्यांचा एककलमी कार्यक्रम बनला. अमरिंदर सिंग यांची भाजपशी कथित जवळीक, अकाली दलाच्या नेत्यांना अनेक आरोपांच्या बाबतीत वाचवत असल्याचा त्यांच्यावर झालेला आरोप आणि पक्षांतर्गत असंतोष या सगळ्याची परिणती अखेर अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यात झाली आणि कॉंग्रेस श्रेष्ठींनी पक्षात अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार आपलाच आहे हेही अधोरेखित केले.

तथापि हे करताना कॉंग्रेसने सिद्धू यांना मुख्यमंत्रिपद दिले नाही हे लक्षवेधी. चन्नी हे दलित समाजातील असल्याने अकाली दल-बसप आघाडीला शह देण्यासाठी त्यांना मुख्यमंत्री केले असा युक्‍तिवाद केला जात असला आणि काही अंशी तो बरोबर आहे.

गुजरातमध्ये रूपाणी यांनी कोणतीही खळखळ न करता राजीनामा दिला; तथापि अमरिंदर यांनी थयथयाट करणे पसंत केले. आपल्याला हटविले नसून आपण स्वेच्छेने राजीनामा दिला आहे असे त्यांनी सांगितलेच; पण काहीही झाले तरी सिद्धू यांना आपण मुख्यमंत्री होऊ देणार नाही अशी त्यांनी गर्जनाच केली. सिद्धू यांच्यावर देशद्रोही असल्याचा गंभीर आरोप केला.

अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांची राजकीय शक्‍ती लयास गेली आहे असे नाही. किंबहुना अगदी काल-परवापर्यंत खुद्द कॉंग्रेस नेते पंजाबात कॉंग्रेस अमरिंदर सिंग यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवेल असे सांगत होते. तेव्हा सिद्धू यांना मुख्यमंत्री केले असते तर अमरिंदर सिंग यांची प्रतिक्रिया काय असती याचा अदमास कॉंग्रेस श्रेष्ठींना लागला असावा.

सिद्धू यांना मुख्यमंत्री करून पक्षात फूट पडली तर निवडणुकीत सत्तेत पुनरागमनाची शक्‍यता मावळून जाईल ही साशंकता देखील असणार. या पार्श्‍वभूमीवर चन्नी यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आले असले तरी अमरिंदर सिंग यांचे आव्हान संपुष्टात आले आहे, असे म्हणता येणार नाही.
याचे कारण एकीकडे गांधी कुटुंबीयांशी आपली जवळीक असल्याचा दावा करतानाच सिद्धू यांच्या विरोधात आपण तगडा उमेदवार देऊ असे अमरिंदर सिंग यांनी जाहीर केले आहे.

हा उमेदवार कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवार असणाऱ्या सिद्धू यांच्याविरोधात असणार; याचाच अर्थ एका प्रकारे अमरिंदर सिंग यांची ती बंडखोरीच असणार. ती करण्यासाठी आता पुढची कोणती पावले अमरिंदर सिंग टाकतात हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे. भाजपला अमरिंदर सिंग यांचा अचानक पुळका आला असला तरी अमरिंदर सिंग भाजपमध्ये गेले तरी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपला त्याचा लाभ होण्यापेक्षा अमरिंदर यांना वैयक्‍तिक तोटा होण्याचा संभव अधिक.

तेव्हा एक तर ते स्वतःचा पक्ष स्थापन करू शकतात. तसे केले तर ते अप्रत्यक्षरीत्या अकाली दलाला साह्यभूत ठरेल; मात्र अमरिंदर यांचे त्याहून मोठे ध्येय हे बहुधा आपल्याकडून नेतृत्व काढून घेतल्याचा पश्‍चात्ताप कॉंग्रेसला व्हावा हे सिद्ध करणे हे असावे. कॉंग्रेसला पराभव स्वीकारावा लागला तर सिद्धू यांचे मुख्यमंत्रिपद आपोआपच बारगळते.

तेव्हा अमरिंदर यांच्या नाराजीचा फार फटका बसू नये पण तरीही अमरिंदर यांच्या एककल्ली कारभारावर सगळी भिस्त नसावी यादृष्टीने मध्यममार्ग कॉंग्रेस श्रेष्ठींनी काढला आहे. या तोडग्याचा निवडणुकीत कॉंग्रेसला लाभ होतो की अमरिंदर सिंग यांचा रोष कॉंग्रेसला महागात पडतो हे अमरिंदर सिंग यांच्या पुढच्या चालींवर अवलंबून आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.