वीर धरणातील पाण्यात राजकीय ‘बुडबुडे’

सासवड – सासवड शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईतून पुरंदर तालुक्‍याचे राजकारण पाणी प्रश्‍नाभोवती फिरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. मात्र, राजकारणाचे बुडबुडे फुटत असल्याने यातून श्रेयवादासाठीची धडपडही उघड झाली. सासवड शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर शहराकरिता गुंजवणी धरणातून 210 क्‍युसेक वेगाने अर्धा टीएमसी पाणी वीर धरणाकडे सोडण्यात आल्याचा गाजावाजा करण्यात आला. परंतु, या पाण्याला वेग देण्यासाठी भाघटर धरणातून पाणी सोडण्यात आले. यामुळे सासवडला गुंजवणीतून पाणी मिळाले असल्याची गाजावाजा प्रत्यक्षात पोकळ बुडबुडाच ठरला.

इंगवली (ता. भोर) या ठिकाणी गुंजवणी आणि निरा या दोन नद्यांचा संगम होतो. गुंजवणी धरणातून सोडलेल्या पाण्याच्या प्रवाहाचा या संगमापर्यंत पोहचताना वेग कमी होता. याच कारणास्तव, निरा नदीत भाटघर धरणातून 1400 क्‍युसेक वेगाने वीर धरणाकडे पाणी सोडण्यात आल्यानंतर इंगवलीतील संगमाच्या ठिकाणाहून हे पाणी वेगाने वाहू लागले. अर्थातच भाटघर धरणातून पाणी सोडल्यानंतरच गुंजवणीच्या पाण्याला वेग आला. यामुळेच वीर धरणात आलेले पाणी गुंजवणीचे नव्हे तर भाटघरचे पाणी मोठ्या प्रमाणात असल्याचे वास्तव आहे. मात्र, सासवड शहराकरिता गुंजवणीचेच पाणी वीर धरणात सोडल्याचा तसेच या पाण्यामुळेच सासवडकरांची तहान भागविल्याचा गाजावाजा राजकीय पातळीवर केला गेला. परंतु, भाटघर धरणातून पाणी सोडण्यात आल्याने खऱ्याअर्थी सासवडला पाणी मिळाले असल्याचे उघड आहे.

बंधाऱ्यांचे दरवाजे बंदच होते…
गुंजवणी धरणातून पाणी सोडताना नदी पात्राच्या नैसर्गिक जडणघडणीचा अभ्यास प्रशासनाकडून केला गेला नसल्याचे दिसून आले. गुंजवणी नदी पात्रात एकूण अकरा बंधारे आहेत. शासकीय नियमानुसार धरणांतून पिण्यासाठी आपत्कालीन विसर्ग केल्यास बंधाऱ्यांचे ढापे उघडे ठेवणे बंधनकारक असताना. या बंधाऱ्यांचे दरवाजे बंदच होते; त्यामुळे हे पाणी बंधाऱ्यांमध्येच अडले असते. शिवाय नदीपात्रात पाणी उपसा करणाऱ्या मोटारीही तशाच असल्याने त्या जोडण्याचीही शेतकऱ्यांनी तयारी केली होती. याबाबतही दक्षता घेतली गेली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.