ग्रामीण भागातील राजकारण ढवळणार

ग्रामपंचायतीची रणधुमाळी कधी जाहीर होणार, याची उत्सुकता

रोहन मुजूमदार

पुणे -राज्य निवडणूक आयोग जिल्ह्यातील 758 ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचना दि. 2 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पुढचे वर्ष उजाडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आणखी काही महिने वाट पहावी लागणार आहे. परिणामी ग्रामीण भागातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. विशेष म्हणजे यावेळी निवडणूक करोनाच्या पार्श्‍वभूमीवर वेगळी राहणार हे निश्‍चित आहे.

करोनामुळे राज्य निवडणूक आयोगाने मार्च महिन्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश काढले होते. यामुळे तालुक्‍यातील 758 ग्रामपंचायतीच्या निवडणुका थांबल्या होत्या. त्यानंतर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाच्या हाती आहे.

आता राज्य शासनाने लॉकडाऊन नियमांमध्ये शिथिलता दिली आहे. त्यानुसार सर्वसामान्य जीवन पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे आगामी काळात काळजी घेत निवडणुका घेवून ग्रामपंचायतीला नवीन कारभारी देण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. तर प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुका कधी लागणार याकडे राजकीय पक्षांसह इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही निवडणुकांपासून तरुण मंडळीही राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक तरुण मंडळी भवतीच फिरणार असल्याने त्या दृष्टीने पॅनलचे लक्ष तरुणांवर केंद्रीत झाले आहे. मात्र, ध्यास कसला काय याचा नेमका अंदाज घेणे कठीण आहे. ग्रामपंचायत निवडणूक आली की तळीरामांचा मोठा उत्सव असतो. आर्थिक लाभाचे प्रलोभन व आपल्या कुशलतेचा सर्वंकष प्रयत्न करणारी जुनी मंडळी आपले रंग दाखविणार असल्याची चर्चा सध्या दबक्‍या आवाजात सुरू आहे.

सरपंचपदाचे आरक्षण अद्याप गुलदस्त्यात

प्रभाग रचना व त्यांचे आरक्षण 2 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे प्रभगानुसार सदस्य पुरुष आहे की स्त्री हे कळणार असल्याने त्या दृष्टीने पॅनलप्रमुख किंवा पक्षाचा स्थानिक नेते जोरदार तयारीला लागणार आहे. दरम्यान, सरपंचपदाचे आरक्षणबाबत अद्याप कोणाताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये घालमेल सुरू आहे.

भाऊबंदकी, नातेवाइक ठरवणार उमेदवार!
ग्रामपंचायतीच्या दर पाचवर्षांनी येणाऱ्या निवडणुकासाठी गल्ली-बोळात, चौकाचौकात मतदारांचा निवडणुकीसाठी गप्पांचा फड रंगत असतात. मात्र, यंदा करोनाच्या पार्श्‍वभूमीवर गप्पांचे फड हे चौकांऐवजी सोशल मीडियावर रंगणार आहे.

तर दर पंचवार्षिक प्रमाणे मतदारांना आकर्षित करण्यासाठी क्‍लृप्त्या लढविल्या जात आहेत. वाडा, नातेवाईक, भाऊबंदकी यांच्या ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष बैठका करूनच उमेदवारी ठरेल एवढे मात्र नक्‍की. त्यामुळे आगामी काही दिवसांत गावागावांत निवडणुकीच्या ऑनलाइन गप्पांना सुरुवात होणार असल्याने गावागावांत उत्साह संचारला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.