पुणे | खेड पंचायत समितीतील राजकारण सामान्यांच्या मूळावर…

11 सदस्य सहलीवर गेल्याने नागरिकांना वाली कोण -अमोल पवार

राजगुरूनगर (प्रतिनिधी) – खेड पंचायत समितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांची कामे रेंगाळली आहेत. उपसभापतींसह 11 सदस्य सहलीवर गेल्याने नागरिकांचे प्रश्न कोण सोडविणार? असा सवाल खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य अमोल पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्यावर 24 मे रोजी अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर 11 सदस्य राजकीय सहलीवर गेले होते. त्यानंतर 31 मे रोजी अविश्वास ठराव दबावाखाली मंजूर झाला. त्यानंतर पुन्हा हे सदस्य राजकीय सहलीवर गेले.

दरम्यान सभापती पोखरकर हे अटकेत आहेत. त्यांच्या पश्‍चात उपसभापतीची जबाबदारी असताना तेही राजकीय सहलीवर गेल्याने नागरिकांचे प्रश्न रखडले आहेत. पंचायत समितीमध्ये नागरिकांच्या समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी कोणी वाली नाही. काळ भयंकर असताना सदस्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. ही खेदाची बाब आहे. हे चुकीचे आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपली जबाबदारी असताना लोकांची विकासकामे प्रश्न सोडविण्याऐवजी आपण पळून, लपून बसने योग्य नाही.

पवार पुढे म्हणाले, जनतेने आपल्याला प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी आपली जबाबदारी आहे. करोनाच्या काळात आपण सर्वांनी चांगले काम केले; मात्र याच काळात लोकांची कामे करण्याऐवजी राजकारण करीत 11 सदस्य राजकीय सहलीवर गेले आहेत. राजकारण हे राजकारणाच्या जाग्यावर राहील. राजकारणात ज्याला संधी मिळेल तो काम करेल. येत्या 25 तारखेपर्यंत उच्च न्यायालयात काय निकाल येईल हे पुढे येईल. मात्र जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण पंचायत समितीत येऊन काम करणे अपेक्षित आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.