पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सिंहगड रस्त्यावरील राजारामपूल चौकातील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले असताना केवळ नेत्यांची वेळ मिळत नसल्याने पूल सुरू केला जात नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गुरूवारी पुलाच्या परिसरात आंदोलन करण्यात आले.
तसेच दि.१२ ऑगस्टपर्यंत हा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला केला नाही तर महाविकास आघाडीकडून दि. १३ ऑगस्टला उड्डाणपूल खुला केला जाईल, असा इशाराही पक्षाच्या वतीने यावेळी देण्यात आला.
महापालिका प्रशासनाने उड्डाणपूलाचे काम अर्धवट असल्याचा दावा केला असून या माहितीचे फलक पुलाच्या ठिकाणी लावण्यात आले. तर भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनावर जोरदार टिका केली आहे.
शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, काका चव्हाण, मृणाल वाणी, पोपटराव खेडेकर, गणेश नलावडे, शशीकांत तापकीर, राजश्री पाटील, अमोघ ढमाले, भक्ती कुंभार, रोहन पायगुडे, समीर पवार, अमोल ननावरे, बाळासाहेब रायकर, अभिजित बारावकर, रमीज सय्यद यांच्यासह पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
या उड्डाणपुलावर डांबराच्या तिसऱ्या कोटचे काम प्रलंबित आहे. ते काम आठवडाभरात पूर्ण होईल. या स्थितीत पूल खुला केल्यास त्यावर खड्डे पडण्याचा धोका आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष अपप्रचार करण्यासाठी आंदोलन करत असून स्थानिक नागरिकांचा त्यांना अजिबात पाठिंबा नाही. – माधुरी मिसाळ. आमदार