राजकीय ‘व्हॅलेंटाईन’ (अग्रलेख)

जगभरातील प्रेमिक आज आपला आवडता प्रेमाचा उत्सव साजरा करणार असतानाच निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांचे “व्हॅलेंटाईन’ही रंगात आले आहे. “व्हॅलेंटाईन डे’चे निमित्त साधून प्रेमिक जशी प्रेमासाठी चाचपणी करीत असतात, तसेच विविध राजकीय पक्ष युती आणि आघाडीसाठी चाचपणी करीत आहेत. पूर्वीचे प्रेमिक असलेले पण आता काडीमोड झालेले पक्षही पुन्हा जुळवून घेण्याच्या तयारीत आहेत. त्याशिवाय “काही नवीन संबंध जुळतात का,’ याचीही चाचपणी केली जात आहे. त्यासाठी दररोज नवनवीन विधाने केली जात आहेत.

केंद्रात भाजपचा पराभव करण्याकरिता समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची आवश्‍यकता असून, “मनसे’नेही बरोबर यावे’, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी मांडले आहे, ते याच धोरणाचा एक भाग आहे. खरे तर अजित पवारांची ही भूमिका कॉंग्रेससाठी अडचणीची ठरू शकते. “कॉंग्रेस-राष्ट्रवादी “मनसे’ला कधीही बरोबर घेणार नाही’, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. त्याशिवाय शरद पवार यांनीही स्पष्ट शब्दात “मनसे’ला विरोध केला होता. तरीही अजित पवारांनी राज ठाकरे यांना बरोबर घेण्याची भूमिका मांडली आहे. हे धोरण कॉंग्रेसला जास्त अडचणीचे ठरणारे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“मनसे’ला अधिकृतपणे आघाडीत घेतले वा मनसेने पाठिंबा दिला तरीही कॉंग्रेसवर हिंदीविरोधी शिक्का बसू शकतो. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड या हिंदी भाषक पट्टयांत कॉंग्रेसला चांगल्या यशाची अपेक्षा आहे. “मनसे’ला बरोबर घेतल्यास भाजप कॉंग्रेसच्या विरोधात हा मुद्दा तापविण्याची शक्‍यताही आहे. मनसेला बरोबर घेण्याचे अजितदादांचे वैयक्तिक मत असल्याचे राष्ट्रवादीच्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले असले तरी अजित पवारांसारखा नेता उगाचच असे विधान करेल असे म्हणता येणार नाही. अशाप्रकारे भाजपविरोधात आघाडी उभारण्याचा संकल्प एकीकडे केला जात असताना, दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांना नवीन मित्र जोडण्यात मात्र अडचणी येत आहेत.

निवडणुका जवळ आल्या असतानाही जागावाटपाबाबत तोडगा निघाला नसल्याने “स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे महाआघाडीत न जाता स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्‍यता आहे. जागा वाटपाबाबत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने शेट्टी नाराज आहेत आणि “एकला चलो रे’चा नारा देण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने स्वाभिमानीला सहा जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र याबाबत ठोस चर्चा झाली नसल्याने शेट्टी यांनी स्वबळाची तयारी केली आहे आणि नऊ जागा लढवण्याची घोषणा केली आहे. तसेच महाआघाडीसाठी आग्रह धरणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीचीही नाराजी प्रकट झाली आहे.

दोन्ही कॉंग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची भावना आंबेडकर यांनी व्यक्त केली असून लोकसभेच्या पाच मतदारसंघात थेट उमेदवारांची घोषणा केली आहे. हे सर्व मतदारसंघ उभय कॉंग्रेसची ताकद असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील आहेत. त्यात राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदारसंघाचाही समावेश आहे. म्हणजेच एकीकडे समविचारी पक्षांकडे दुर्लक्ष होत असतानाच राज ठाकरे यांच्यासारख्या नवीन मित्राकंडे मैत्रीचा हात केला जात आहे.

दुसरीकडे, भाजप आणि शिवसेना यांच्यातील मैत्रीचाही आता नवीन वळणावर विचार सुरु झाला आहे. जरी हे दोन पक्ष सत्तेत भागीदार असले तरीही आगामी निवडणुकीत त्यांची युती होईल की नाही, याबाबत अद्याप काहीच निश्‍चित नाही. भाजपचे शिवसेनेवर “एकतर्फी प्रेम’ असल्याची टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली होती. 25 वर्षापेक्षा जास्त काळ एकत्र राहूनही या दोन पक्षांची तोंडे आता दोन दिशांना आहेत. शिवसेना युती करण्याच्या मुडमध्ये नाही, असे शिवसेनेच्या नेत्यांच्या विधानांवरुन स्पष्ट होत आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतली खराब कामगिरी आणि देशपातळीवर विरोधकांची होत असलेली आघाडी, या पार्श्‍वभूमीवर भाजपसमोर मित्रपक्षांची मनधरणी करण्याशिवाय अन्य पर्याय नाही. टीडीपी, आरएलएसपी, आसाम गण परिषद हे पक्ष भाजप आघाडीमधून बाहेर पडल्याने भाजप मित्रपक्ष टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. नवे मित्रपक्ष जोडण्याचाही भाजपचा प्रयत्न आहे. शिवसेना हा सर्वात महत्वाचा मित्र असल्यानेच भाजप अध्यक्ष अमित शहा यांना उध्दव ठाकरे यांच्याशी वाटाघाटी कराव्या लागत आहेत आणि जागावाटपाबाबत चर्चा करावी लागत आहे. पण स्वबळाची घोषणा केलेल्या आणि या घोषणेचा पुनरुच्चार करणाऱ्या ठाकरे यांच्यासाठी आता वाटाघाटी महत्वाच्या आहेत.

भाजपचा केवळ लोकसभेपुरता जागावाटपाचा आग्रह असला तरी लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही जागावाटप व्हावे, अशी ठाकरे यांची भूमिका आहे. “आपणच मोठे भाऊ’ असल्याच्या भूमिकेपासून आपण हटणार नाही, असे स्पष्ट संकेतही शिवसेनेने दिले आहेत. “व्हॅलेंटाईन डे’ आज संपणार असला तरी राजकीय व्हॅलेंटाईन मात्र यापुढेही चर्चेत राहणार आहे.

आगामी निवडणूक सर्वात महत्वाची असल्यानेच सत्ताधारी आणि विरोधी आघाडी आपापल्या परीने मित्रांना चुचकारण्याचा प्रयत्न करणार आहेत हे उघड आहे. प्रेमिकांमध्ये “जशी तू नही तो और कोई’ अशी भावना असते तशी भावना मात्र राजकीय पक्षांना बाळगता येणार नाही. कारण सध्याचा आपला मित्र कधी विरोधी आघाडीला जाऊन मिळेल, याबाबत काहीच सांगता येणार नाही.

म्हणूनच नजिकच्या काळातील मैत्री आणि काडीमोड आगामी राजकारणासाठी अतिशय महत्वाचे ठरणार आहेत. आपण म्हणायचे “हॅपी पोलिटिकल व्हॅलेन्टाईन डे!!!’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)