नवी दिल्ली – उत्तराखंड विधनासभा निवडणुकीअगोदर भाजपामध्ये मोठी राजकीय उलाथापालथ पाहायला मिळत आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या सोबत पार पडलेल्या दोन बैठकांनंतर आज(मंगळवार) मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी अखेर आपला राजीनामा दिला. उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी राणी मौर्य यांची भेट घेऊन, रावत यांनी आपला राजीनामा त्यांना सादर केला.
मुख्यमंत्री रावत यांनी सोमवारी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांची त्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीअगोदर त्यांनी राज्यसभा सदस्य अनिल बलूनी यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यानंतर नड्डांसोबत त्याची जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली. या चर्चेनंतर माध्यमांच्या कोणत्याही प्रश्नाचे रावत यांनी उत्तर दिले नाही व ते दिल्लीकडे रवाना झाले होते.
मुख्यमंत्री रावत आणि भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यातील बैठक ही दोन दिवसांपासून उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या नाट्यमय घडमोडींच्या पार्श्वभूमीवर पार पडली. जेव्हा भाजपा उपाध्यक्ष रमन सिंह आणि सरचिटणीस व राज्याचे प्रभारी दुष्यंत गौतम हे कोणताही नियोजीत कार्यक्रम नसताना देहरादूनला पोहचले आणि राज्याच्या कोर कमिटीतील नेत्यांसोबत बैठक केली होती. यानंतर या दोघांनी देखील आपला अहवाल भाजपा अध्यक्ष नड्डा यांच्याकडे सोपवला होता.